Maharashtra MLC Election 2020: विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल; पुण्यातून जयंत आसगावंकर तर नागपूरमधून अभिजित वंजारींनी दाखल केले अर्ज

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या पुणे आणि नागपूर मतदारसंघातील उमेदवारींनी आज अर्ज दाखल केले.

Vidhan Sabha | Photo Credits: Twitter

औरंगाबाद, पुणे, नागपूर येथे पदवीधर आणि अमरावती, पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी विधानपरिषदेची निवडणूक (Maharashtra MLC Election 2020) 1 डिसेंबर रोजी होणार आहे. विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या पुणे आणि नागपूर मतदारसंघातील उमेदवारींनी आज अर्ज दाखल केले. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रा. जयंत आसगांवकर व पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार अरुण लाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

यावेळी आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते, यात महसूलमंत्री बाळासाहेब खोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मंत्री व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, खा. वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे हे उपस्थित होते. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे अभिजित वंजारी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,  उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र सहप्रभारी आशिष दुआ, आ. विकास ठाकरे, प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (हेही वाचा: महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी सर्व पक्षांतील उमेदवारांची नावे जाहीर, येथे पाहा पूर्ण यादी)

या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. ही निवडणूक 1 डिसेंबर या दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत विधानभवनात मतदान पार पडेल. निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती.