BJP Maha Janadesh Yatra: भाजप हाऊसफुल, आमची मेगाभरती नव्हे तर, लिमिटेड भरती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1 ऑगस्टपासून सुरु झालेली ही यात्रा राज्याच्या विविध भागांतून मार्गक्रमण करणार आहे
Maharashtra Vidhan Sabha Election 2019: काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातून अनेक लोक आज भाजपमध्ये येत आहेत. पण, आमची मेगाभरती नाही तर, लिमिटेड भरती आहे. त्यामुळे ज्यांच्या भाजप ध्येयधोरणांवर विश्वास आहे आणि ज्यांना जनाधार आहे, अशांनाच पक्षात घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली महाजनादेश यात्रा (Maha Janadesh Yatra) आज (2 ऑगस्ट 2019) वर्धा येथे पोहोचली. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते. विरोधकांनी लावून धरलेल्या ईव्हीएमबाबतच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांनी या वेळी जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही जोरदार टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकतीच कार्यकर्त्यांकडून पक्षनिष्ठेची शपथ घेतली. आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत राहू असा या शपथेत उल्लेख होता. हाच धाका पकडत नामोल्लेख टाळत मुख्यमंत्री म्हणाले की, कार्यकर्त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून त्यांना पक्षनिष्ठेची शपथ घेण्याची त्यांच्यावर वेळ आल आहे. पण, शपथ घेतलेले तरी पक्षात राहतील की नाही हे माहिती नाही. या पक्षात लोक रहायलाच तयार नाहीत, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक लोक आज भाजपमध्ये येत आहेत. पण, आमच्याकडे हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे. ज्यांना जनाधार आहे. ज्यांचे रेकॉर्ड चांगले आहे, अशांनाच आम्ही भाजपमध्ये स्थान देऊ असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या जागावाटपाच्या वाटाघाटीचे सर्वाधिकार हे राज्यातील नेत्यांना दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, काँग्रेस सरकारच्या 15 वर्षाच्या सत्तेपेक्षा दुप्पट काम 5 वर्षात केलं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा)
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या मोझरी गावातून महाजनादेश यात्रा प्रारंभ केला. 1 ऑगस्टपासून सुरु झालेली ही यात्रा राज्याच्या विविध भागांतून मार्गक्रमण करणार आहे. ही यात्रा विदर्भातील ६२ पैकी ४४ विधानसभा मतदारसंघातून जात यात्रा १ हजार २३२ किलोमीटर इतके प्रदीर्घ अंतर पूर्ण करेल.