Maharashtra Gram Panchayat Election 2021: राज्यातील 34 जिल्ह्यांत 14,234 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान, 18 तारखेला मतमोजणी

Maharashtra Gram Panchayat Election 2021 Dates: राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक (Gram Panchayat Election 2021) कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

Gram Panchayat | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यात कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुका आता पार पडू लागल्या आहेत. यात ग्रामपंचायत निवडणुकांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक (Gram Panchayat Election 2021) कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित प्रदेशांसाठी आजपासून आदर्श अचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज मुंबई येथे ही घोषणा केली.

ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती देताना आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले की, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. (हेही वाचा, Gram Panchayat Election In Nashik District: नाशिक जिल्ह्यात रंगणार ग्रामपंचायत निवडणुकीचा फड, 102 गावांमध्ये पुन्हा एकदा नवा उत्साह)

15 जानेवारीला मतदान, 18 जानेवारीला मतमोजणी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार

विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement