महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या काळात दीड लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळवून देण्यास केली मदत

497 उद्योजगांनी या काळात 86 हजार 435 रिक्तपदं भरण्यासाठी खुली केली. यासाठी 1 लाख हजारापेक्षा अधिक लोकांनी आपले अर्ज दाखल केले होते.

JOB प्रतिकात्मक फोटो (File Photo)

कोरोना संकटकाळामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अनेकांना भेडसावत होता. अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्याने अनेकांच्या नोकर्‍यांवर गंडांतर आले होते. मात्र या काळात महाराष्ट्रात  कौशल्य विकास विभागाने जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयंम वेबपोर्टलमार्फत नोकरीची संधी याबद्दल माहिती देत अनेकांना मदत करण्यात आली आहे. यामुळे केवळ डिसेंबर महिन्यात 34 हजार 763 लोकांना नोकरीच्या संधीचा फायदा घेता आला तर जानेवारी ते डिसेंबर महिन्यातील काळात 1 लाख 99 हजार 486 बेरोजगारांना नोकरीची संधी मिळवून देण्यात कौशल्य विभागाने मोलाची भूमिका पार पाडली असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. कोविड-19 संकटात बेरोजगारांना मोठा दिलासा; ऑनलाईन रोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टलमार्फत तब्बल 17 हजार 715 बेरोजगारांना रोजगार.

महाराष्ट्रासह देशभरात मार्च पासून लॉकडाऊन जाहीर झाल्याने सारंच क्षणात ठप्प झालं. मोलमजुरी करणार्‍यांंपासून कॉर्परेट जगतात वावरणार्‍या अनेकांच्या हातातून काम गेले. पण पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच उद्योजक, विविध कंपन्या यांच्यासोबत एकत्र येऊन समन्वय घडवून आणत अनेकांना नोकरीच्या संधी बाबत माहिती देण्याचं काम पोर्टलने केल्याचं सांगितलं जात आहे.

12 ते 20 डिसेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळावा पार पडला. 497 उद्योजगांनी या काळात 86 हजार 435 रिक्तपदं भरण्यासाठी खुली केली. यासाठी 1 लाख हजारापेक्षा अधिक लोकांनी आपले अर्ज दाखल केले होते. आता भविष्यातही ही पोर्टलद्वारा नोकरीच्या संधीची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम सुरू राहणार आहे.

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत केले जाते.