E-Shram Portal: असंघटित कामगारांसाठी खुशखबर! वन-स्टॉप-सोल्यूशन ई-श्रम पोर्टलवर आता केंद्राच्या 12 योजना उपलब्ध, 30.58 कोटीहून अधिक लोकांनी केली नोंदणी
ई-श्रम पोर्टलची सुलभता वाढवण्यासाठी, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 7 जानेवारी 2025 रोजी ई-श्रम पोर्टलवर भाषिणी प्लॅटफॉर्मचा वापर करून विविध भाषांमध्ये ते सुरु केले आहे. यामुळे आता कामगारांना 22 भारतीय भाषांमध्ये ई-श्रम पोर्टलशी संवाद साधता येईल, सर्वांसाठी सुलभता वाढेल आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन मिळेल.
श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित कामगारांचा आधार संलग्न एक व्यापक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी 26 ऑगस्ट 2021 रोजी ई-श्रम पोर्टल (eshram.gov.in) सुरू केले. ई-श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांना सार्वत्रिक खाते क्रमांक (UAN) देऊन स्व-घोषणा आधारावर त्यांची नोंदणी आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी आहे. 28 जानेवारी 2025 पर्यंत, 30.58 कोटीहून अधिक असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी, म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून 31 डिसेंबर 2024 दरम्यान ई-श्रम पोर्टलवर दररोज सरासरी 33.7 हजार नोंदणीसह 1.23 कोटींहून अधिक नोंदणीची नोंद झाली आहे.
असंघटित कामगारांपर्यंत विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ पोहचावा यासाठी ई-श्रम हा वन-स्टॉप-सोल्यूशन म्हणून विकसित करण्याबाबत अलिकडील अर्थसंकल्पीय घोषणेला अनुसरून, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 21 ऑक्टोबर 2024 रोजी ई-श्रम- ‘वन-स्टॉप-सोल्यूशन’ सुरू केले. ई-श्रम- वन-स्टॉप-सोल्यूशनमध्ये विविध सामाजिक सुरक्षा/कल्याणकारी योजनांचे एकाच पोर्टलवर म्हणजेच ई-श्रम वर एकत्रीकरण केले आहे. यामुळे ई-श्रमवर नोंदणीकृत असंघटित कामगारांपर्यंत सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती पोहचते आणि ई-श्रम च्या माध्यमातून ते आतापर्यंत मिळवलेले फायदे पाहू शकतात.
आतापर्यंत, विविध केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या 12 योजना ई-श्रम वर एकत्रित/मॅप करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, पीएम स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी, पीएम आवास योजना- शहरी, पीएम आवास योजना- ग्रामीण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) यांचा समावेश आहे. (हेही वाचा: 8th Pay Commission Salary Hike: आठवा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना करणार मालामाल? जाणून घ्या संभाव्य Fitment Factor, वेतनवाढ, पेन्शन सुधारणा)
ई-श्रम पोर्टलची सुलभता वाढवण्यासाठी, श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 7 जानेवारी 2025 रोजी ई-श्रम पोर्टलवर भाषिणी प्लॅटफॉर्मचा वापर करून विविध भाषांमध्ये ते सुरु केले आहे. यामुळे आता कामगारांना 22 भारतीय भाषांमध्ये ई-श्रम पोर्टलशी संवाद साधता येईल, सर्वांसाठी सुलभता वाढेल आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन मिळेल. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
(The above story first appeared on LatestLY on Feb 04, 2025 10:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

