ISI chief Asim Malik appointed as National Security Advisor (फोटो सौजन्य - X/@AdityaRajKaul)

Asim Malik Appointed NSA: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला दररोज नव-नवीन धक्के देत आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आङे. पाकिस्तान भारताच्या लष्करी तयारीला पूर्णपणे घाबरला आहे. पाकिस्तानने आता त्यांचे आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक (Asim Malik) यांना एनएसए (National Security Advisor) चा अतिरिक्त कार्यभार देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, असीम मलिक यांना अतिरिक्त कार्यभार म्हणून ही जबाबदारी देण्यात आली आहे.

पाकिस्तानची झोप उडाली -

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या निर्णायक प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हा मोठा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या ठाम आणि स्पष्ट भूमिकेमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. या हल्ल्यानंतर तो सतत बॅकफूटवर असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे भारताकडून योग्य उत्तर मिळण्याची भीती आहे, तर दुसरीकडे या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: भारताने पाकिस्तानचे पाणी केले बंद; Indus Waters Treaty स्थगित झाल्यानंतर सियालकोटजवळ चिनाब नदीचा प्रवाह झाला कमी, पहा उपग्रह प्रतिमा)

पाकिस्तानकडून सतत युद्धबंदीचे उल्लंघन -

दरम्यान, पाकिस्तान सीमेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानी सैन्याने सलग सातव्या दिवशी कोणत्याही चिथावणीशिवाय शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने काश्मीरमधील कुपवाडा, उरी आणि जम्मूमधील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय सैन्याने याला चोख प्रत्युत्तर दिले. (हेही वाचा: India Bans Pakistani YouTube Channels: चिथावणीखोर आणि खोटी माहिती प्रसारित केल्याबद्दल भारताकडून 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी)

असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती - 

लष्कराच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी, 28-29-30 एप्रिल रोजी, पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांमध्ये तसेच अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय सैन्याने या चिथावणीला संतुलित आणि प्रभावी पद्धतीने प्रत्युत्तर दिले. त्याचप्रमाणे, 27-28 एप्रिलच्या रात्री पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरही गोळीबार केला होता.