Maharashtra Government Formation Live News Updates: राष्ट्रपती राजवट लागू होणे दुर्दैवी- देवेंद्र फडणवीस

राज्यापालांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाचारण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व असा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. आज तरी हा पेच सुटणार का? याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे. लेटेस्टली मराठीची ही उत्सुकता ध्यानात घेऊनच आम्ही क्षणाक्षणाच्या घडामोडी आपणांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यासाठी लेटेस्टली मराठीसोबत जोडलेल जा.

13 Nov, 02:09 (IST)

राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याचा प्रसंग राज्यावर ओढविणे, हे अतिशय दुर्दैवी असून महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार मिळेल असा विश्वास भाजपा विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकाद्वारे म्हटले आहे. राज्यात अनेक गंभीर प्रश्न असून या राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात होणा-या गुंतवणुकीवर त्याचा विपरित परिणाम होईल. म्हणूनच माझी अपेक्षा आहे की सर्वच पक्ष या स्थितीचा गांभीर्याने विचार करतील आणि राज्याला स्थिर सरकार लवकरच मिळेल, अशी आपण अपेक्षा करतो असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे. 

13 Nov, 01:51 (IST)

'मी आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्नशील असून सत्ता स्थापनेसाठी भाजपला सर्वतोपरी मदत करेन' असे नारायण राणे यांनी सांगितले. तसेच शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेससह जाऊ शकत नाही असेही ते पुढे म्हणाले.  महाआघाडी शिवसेनेला 'उल्लू' बनवत असून शिवसेनेची वागणूक नैतिकतेला धरुन नाही असे नारायण राणे म्हणाले.

13 Nov, 01:35 (IST)

शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम असून राज्यपालांच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली आहे. 

13 Nov, 01:13 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली असून राष्ट्रपती राजवट लागू करण्यावर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीशी चर्चा केल्यानंतरच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मिळणे आवश्यक असून तुर्तास निर्णय नाही.

13 Nov, 24:44 (IST)

रिट्रीट हॉटेलमध्ये शिवसेना नेत्यांची बैठक संपली असून, राष्ट्रपती राजवटीला घाबरण्याचे कारण नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले आहे. तसेच आपण आपल्या मागण्यांवर ठाम राहायचे असेही त्यांनी सांगितले आहेत. 

13 Nov, 24:31 (IST)

काँग्रेस नेत्यांशी पत्रकार परिषदेत चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार. 

12 Nov, 23:51 (IST)

मुख्यमंत्री पदासह सत्तेचे समान वाटप व्हायला हवं असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेकडे पाठवला आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. तसेच बाहेरुन पाठिंब्याऐवजी काँग्रेसने सत्तेत सहभागी व्हावं असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे. 

12 Nov, 23:44 (IST)

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवसेना नेत्यांशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या भूमिकेनंतर सेना आमदारांशी खलबतं सुरु

12 Nov, 23:06 (IST)

महाराष्ट्रात राजकीय वातावरण पेचात सापडल्याने अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या आदेशावर राष्ट्रपतींकडून मोहर मिळाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे.

12 Nov, 22:15 (IST)

शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की, शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करायची यावर विचार करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेस नेते मल्लिकार्जून खडगे, अहमत पटेल आणि सी.के. वेणुगोपाल हे मुंबईत दाखल झाले आहेत. हे तिन्ही नेते काँग्रेसचे राज्यातील नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत तसेच, गरज असल्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

12 Nov, 21:55 (IST)

सत्तास्थापनेसाठी आवश्यक वेळ राज्यपलांकडून वाढवून मिळावा यासाठी शिवसेना न्यायालयात दाद मागणार आहे. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपील सिब्बल न्यायालयात कायदेशीर खिंड लढवणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे.

12 Nov, 21:38 (IST)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी पाचारण केले. मात्र, बहुमताचा आकडा अद्याप मिळाला नसल्याने सत्तास्थापनेचा दावा करण्या विलंब होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यपालांना वेळ वाढवून मागितला होता. मात्र, ही वेळ वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने मुदत वाढवून मागितल्यानेच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस केल्याचे समजते.

12 Nov, 21:03 (IST)

महाराष्ट्राची राजकीय वाटचाल पुढे कशी होणार. राज्यात सरकार स्थापन होणार की नाही अशी उत्सुकता असतानाच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याचे वृत्त आहे.

12 Nov, 20:19 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले सर्व 54 आमदारांची एक बैठक वाय.बी. सेंटर,  मुंबई येथे आज (मंगळवार, 12 नोव्हेंबर) पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष आणि इतर पक्षांसोबत सरकार स्थापन करण्यासंबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर मलिक प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

12 Nov, 19:33 (IST)

राज्यपालांकडून केंद्रीय गृहमंत्रालयाला महाराष्ट्रातील सध्यास्थितीबाबतची माहिती देणारा अहवाल पोहोचला असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होईल याबाबत माहिती नसली तरी, यात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत चर्चा होऊ शकते.

12 Nov, 19:15 (IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन करण्यास असमर्थता व्यक्त केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात. आतापर्यंत सर्वाधिक सख्याबळ असलेली भाजप सत्तास्थापन करण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेली शिवसेना हा पक्षसुद्धा बहुमत स्थापन करण्यास असमर्थ ठरला आहे. आता राज्यपालांनी तिसरा पर्याय अवलबंबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाचारण केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर सत्तास्थापनेत असमर्थता व्यक्त केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

12 Nov, 18:33 (IST)

शिवसेना नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक उद्धव ठाकरे यांचे निवास्थान 'मातोश्री' येथे पार पडत आहे. उद्धव ठाकरे यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतल्यानंतर ही बैठक पार पडत आहे. राऊत यांच्या भेटीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे तसेच आशिष शेलार हे येऊन गेल्यानंतर ही बैठक पार पडत आहे. त्यामुळे या बैठकीस महत्त्व प्राप्त झाले आहे.

12 Nov, 18:29 (IST)

भाजप नेते आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीत राऊत यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे शेलार यांनी सांगितले. व्यक्तिगत नातेसंबंध आणि महाराष्ट्राची परंपरा यांमुळे आपण राऊत यांच्या भेटीला गेलो. प्रकृतीच्या कारणास्तव राऊत यांनी थोडे कमी बोलावे, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी व्यक्त केली. राऊत यांच्या भेटीनंतर ते प्रसारमाध्यमा्ंशी बोलत होते.

12 Nov, 18:02 (IST)

काँग्रेसचे केंद्रीय नेते मल्लीकार्जून खडगे, अहमद पटेल आणि केसी वेणुगोपाल हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या ते राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली येथील सोनिया गांधी यांचे निवासस्थान 10 जनपथवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Read more


Maharashtra Government Formation Live News Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल लागला. या निकालात भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले. या निकालानंतर सर्वांनाच उत्सुकता होती सत्तास्थापना कशी होते याकडे. मात्र, शिवसेना-भाजप यांच्यात सत्तासंघर्ष तयार झाला आणि सेना-भाजप युतीला जनादेश असतानाही राज्यात सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे आम्ही बहुमत सिद्ध करु शकत नाही हे भाजपला सांगावे लागले. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. मात्र, शिवसेनाही बहुमत सिद्ध करु शकली नाही. आता राज्यापालांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाचारण केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व असा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. आज तरी हा पेच सुटणार का? याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता आहे. लेटेस्टली मराठी वाचकांची ही उत्सुकता ध्यानात घेऊनच आम्ही क्षणाक्षणाच्या घडामोडी आपणांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यासाठी लेटेस्टली मराठीसोबत जोडलेल जा.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now