Maharashtra Floods: पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घेणार 5 गावांना दत्तक

पूरग्रस्त गावांना मदतीचा हात म्हणून पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ येथील 5 गावांना दत्तक घेणार आहेत.

Pune University (Photo Credits: Wiki Commons)

गेले काही दिवस पूराने वेढलेल्या कोल्हापूर (Kolhapur), सांगलीतील (Sangli) गावे आता हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. पै अन् पै जमवून, अहोरात्र कष्ट करुन, घाम गाळून उभारलेले चार भिंतींचे घर या पूरात क्षणार्धात उध्वस्त झाले. आपल्या संसार वाहून जाताना इथल्या लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. त्यांना करावी तेवढी मदत कमीच पडेल. त्यांच्या मनात सध्या काय चालू असेल याची कल्पना जरी केली तरी अंगावर काटा उभा राहिल. अशा लोकांचा संसार जरी मोडला असेल तरी त्यांचा कणा म्हणजेच पुन्हा नव्याने सर्व निर्माण करण्याची जिद्द कायम आहे. त्यांनाच मदतीचा हात म्हणून पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) येथील 5 गावांना दत्तक घेणार आहेत.

मटा ने दिलेल्या बातमीनुसार, शासनाच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यापीठ पाच गावांना दत्तक घेऊन या गावांच्या पुर्नवसनासाठी हातभार लावणार आहेत. तसेच या उपक्रमात शिक्षण क्षेत्राशी निगडित असणाऱ्या सर्व घटकांना सामावून घेतले जाणार आहे.

हेही वाचा- कोल्हापूर-सांगली मधील पुरग्रस्तांसाठी तुळजापूर तुळजाभवानी संस्थेकडून 50 लाख रुपयांची मदत

राज्यातील सर्वच भागातून तसेच स्तरातून पूरग्रस्तांसाठी जमेल तेवढी मदतकार्य सुरु असून पिण्याचे पाणी, बिस्कीट, भाकरी, कपडे, दैनंदिन जीवनाच्या आवश्यक वस्तू त्यांना पुरविल्या जात आहेत. मात्र या लोकांना या मदतीसोबत मुख्य गरज आहे ती मानसिक आधार देण्याची आणि गाव स्वच्छ करण्यासाठी मनुष्यबळाची. म्हणूनच त्यांचे मनोबल वाढवून त्यांचे त्यांना हवी ती मदत करण्याचे दृष्टीने पूरग्रस्त भागातील 5 गावांना दत्तक घेण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले विद्यापीठाने घेतला आहे.

या विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मदतीने पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. विभागीय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार विद्यापीठाकडून पाच गावे दत्तक घेतली जातील. तसेच शासनाकडून राबविल्या जाणा-या पुर्नबांधणीच्या कामात विद्यापीठाचे विद्यार्थी सहभाग घेतील.