Maharashtra Floods: राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 129 जणांचा मृत्यू; बाळासाहेब थोरात यांची माहिती

यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर दरड कोसळणे, भिंती पडणे यांसारख्या अनेक दृर्घटनाही घडल्या.

Maharashtra Floods (Photo Credits: ANI)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. यामुळे कोकण (Kokan), पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर दरड कोसळणे, भिंती पडणे यांसारख्या अनेक दृर्घटनाही घडल्या. या सगळ्यात राज्यातील तब्बल 129 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी दिली आहे. रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सातारा (Satara) जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या एकूण 5 घटना घडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी लोक वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. आज महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्यात एकूण 38 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 129 वर पोहचली आहे.

आज दिवसभरात राज्यात एकूण 81 जणांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळीये येथे दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सातारा जिल्ह्यातील आंबेघर येथे 12 जणांचा आणि वाई येथे 2 महिलांचा मृत्यू झाला आहे. रायगडमधील पोलादपूर येथे 11 जणांचा मृत्यू झाला असून रत्नागिरीतील खेड तालुक्यातील पोसरे येथे दरड कोसळून एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्याील कणकवली तालुक्यातील दिगवळे येथे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.  (Maharashtra Rain Forecast: पुढील 24 तास कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये येथील दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख आणि जखमींना 50 हजारची मदत जाहीर केली आहे.