Maharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता

त्यावेळी त्यांनी पूरग्रस्त व्यापारी आणि दुकानदारांशी संवाद साधला. प्रदेशातील सामान्य परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Flood (Photo Credits: Twitter/ DDI Kolhapur)

महाराष्ट्रातील (Maharashtra Rains) विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी,  रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara) यासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूर (Floods) आला आहे. तसेच राज्यात दरड कोसळण्यासह (Landslides) मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) मरण पावलेल्या लोकांच्या संख्येतही आणखी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 164 जणांनी जीव गमवला आहे. तर, अजूनही 100 जण बेपत्ता असल्याचे समजत आहे. या व्यतिरिक्त अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय सैन्य दल, नौदल, हवाई दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि तटरक्षक दलाच्या पथके अद्यापही विविध भागात तैनात आहेत आणि मदत आणि बचावकार्य राबवित आहेत. तर, बचाव दल पीडितांना अन्न, औषध आणि इतर मदत पुरवित आहेत.

महाराष्ट्र सरकारने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात पूर आणि मुसळधार पावसामुळे 1028 गाव प्रभावित झाले आहेत. राज्यातील मृतांची संख्या 164 वर पोहचली आहे. तर, अजूनही 100 जण बेपत्ता आहेत. एकूण 56 जखमी झाले आहेत. याशिवाय, 2.29 लाख पूरग्रस्तांना लोकांना वाचवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सध्या 259 निवारांमध्ये 7,832 लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जाणार होते पण कमी दृश्यमानतेअभावी हेलिकॉप्टरमधूनचा दौरा रद्द

ट्वीट-

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण गावात पूरग्रस्तांसाठी पाच मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. एनडीआरएफचे 25 पथके, एसडीआरएफच्या चार पथके, तटरक्षक दलाच्या दोन संघ, नौदलाच्या पाच पथक आणि सैन्याच्या तीन पथक मदत व बचावकार्य राबवित आहेत. चिपळूणला मुंबईला जोडणारी वशिष्ठी नदीवरील पूल कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने रायगड आणि रत्नागिरीला प्रत्येकी दोन कोटी रुपये आणि इतर बाधित क्षेत्रांना मदतकार्यासाठी 50 लाख रुपये मंजूर केले आहेत. केंद्र सरकारनेही बाधित व्यक्तींना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. ज्या परिसरात पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे, त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू केली गेली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूण येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी पूरग्रस्त व्यापारी आणि दुकानदारांशी संवाद साधला. प्रदेशातील सामान्य परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. उद्धव ठाकरे म्हणाले की, दीर्घकालीन मदतीसाठी केंद्रीय सहाय्य आवश्यक आहे. सोमवारी ते पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यावर येतील. तसेच नुकसानीच्या प्रमाणावर विस्तृत माहिती तयार केली जाईल, असेही ते म्हणाले आहेत.