Final Year Exams: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विनापरिक्षा उत्तीर्ण करा; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची UGC ला विनंती
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विद्यापीठ अनुदान आयोगास (UGC) पत्र पाठवून शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणे पार करण्यात यावे अशी सूचना केली आहे.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विद्यापीठ अनुदान आयोगास (UGC) पत्र पाठवून शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणे पार करण्यात यावे अशी सूचना केली आहे. यापूर्वी राज्याने कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पदवी आणि पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सोडून अन्य विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करण्याचा निर्णय जाहीर केला होता, मात्र अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची (Final Year Students) परीक्षा रद्द न करता पूढे ढकलण्यात आली होती. सध्या कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता परिस्थिती कधी नियंत्रणात येईल हे सांगणे कठीण आहे तरी पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी अंतिम वर्षाची सुद्धा परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्याच्या पर्यायावर विचार करा” अशी विनंती सामंत यांनी केली आहे.
युजीसीला दिलेल्या पत्रात उदय सामंत यांनी म्हंटले आहे की, राज्य सरकारने अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळता डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांना पदोन्नती देण्याचे निर्णय घेतले. विद्यार्थ्यांचे ग्रेडिंग युजीसी आणि राज्यस्तरीय समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले जाईल. तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित परीक्षा व शैक्षणिक वर्ष याविषयी राज्य सरकारला सल्ला देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यस्तरीय समिती नेमली होती. समितीने आपला अहवाल 6 मे रोजी सादर केला. या अहवालानुसार कोरोनाचे रुग्ण पाहता जुलै पर्यंत परीक्षा घेणे शक्य होईल का याबाबत संशय आहे. या पार्श्वभूमीवर सामनात यांनी युजीसीला परीक्षा न घेता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पास करण्याची विनंती केली.
उदय सामंत ट्विट
दरम्यान राज्यात सर्वत्र कोरोनाचे संकट आहे अशा वेळी परीक्षेच्या निमित्ताने सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरण करूनही सुमारे 8 लाख ते 10 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं हे धोक्याचे आहे. याचा विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो, हा धोका पत्करण्या ऐवजी नियमावली काढून या विद्यार्थ्यांना पास करता येईल हे तपासावे असे उदय सामंत यांच्याकडून युजीसी ला सुचवण्यात आले आहे.