महाराष्ट्र काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव; केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून होणारा गैरवापर थांबवण्याची विनंती

ईडीद्वारे पुढे त्यांना लक्ष्य केले जाईल का? या प्रश्नावर, नाना पटोले म्हणाले, ते तपास संस्थेचे ‘स्वागत’ करतील, परंतु सर्वांनी एकजुटीने विरोध करण्याची आणि भाजपच्या दबाव यंत्रणेशी लढण्याची वेळ आली आहे.

Nana Patole | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) गुरुवारी सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्टामध्ये धाव घेतली असून, न्यायालयाने स्वतःहून हस्तक्षेप करून केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपकडून होणारा गैरवापर थांबवावा, अशी विनंती केली. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी, भाजप आणि केंद्राने ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा तैनात केल्या आहेत त्यावर टीका केली आणि आता देशाच्या लोकशाही व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी न्यायालयांनी स्वतःहून हस्तक्षेप केला पाहिजे, असे म्हटले.

फोन-टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध पटोले यांनी 500 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. हा खटला लढत असलेले नागपूर येथील प्रख्यात वकील सतीश उके यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) टाकलेल्या छाप्यांचा संदर्भ देताना नाना पटोले यांनी ही टिप्पणी केली.

नाना म्हणाले, ‘सतीश उके बदनामी प्रकरणात आमचे वकील आहेत. त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. आता अचानक ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकून केस फाईल, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी जप्त करून त्यांना ताब्यात घेतले आहे. अॅड. उके हे न्यायाधीश बीएच लोया यांचा संशयास्पद मृत्यू यासह इतर प्रकरणांवर काम करत होते. आता ईडीची ही कारवाई भाजपविरोधात बोलणाऱ्या सर्वांना दडपण्यासाठी आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘केंद्रीय तपास यंत्रणा आंतरराष्ट्रीय मनी-लाँडरिंग घोटाळे, ड्रग ट्रॅफिकिंग, फेमा, फेरा उल्लंघन, दहशतवादी निधी, मानवी तस्करी किंवा देह व्यापार यासारख्या त्यांच्या कार्यापासून भरकटत आहेत.’

पटोले यांनी केंद्रावर अशा कृत्यांद्वारे विरोधी पक्षांना धमकावण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर करून, निवडून आलेली राज्य सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘लोकशाही उलथून टाकली गेली आहे आणि त्याची जागा हुकूमशाहीने घेतली आहे. देशात अघोषित आणीबाणीची स्थिती आहे. सर्व व्यवस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि आम्ही देशातील लोकशाही शासन वाचवण्यासाठी लढा देत आहोत. आम्ही न्यायालयांना नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी मदत करावी.’ (हेही वाचा: Advocate Satish Uke यांच्या नागपूर मधील निवासस्थानी ED ची छापेमारी)

ईडीद्वारे पुढे त्यांना लक्ष्य केले जाईल का? या प्रश्नावर, नाना पटोले म्हणाले, ते तपास संस्थेचे ‘स्वागत’ करतील, परंतु सर्वांनी एकजुटीने विरोध करण्याची आणि भाजपच्या दबाव यंत्रणेशी लढण्याची वेळ आली आहे.