Anil Deshmukh यांच्यावर Param Bir Singh यांनी केलेल्या आरोपांची निवृत्त High Court Judge कडून चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

या चौकशी मध्ये सत्य समोर येईल असे त्यांनी म्हटलं आहे.

Anil Deshmukh | Photo Credits: Twitter/ANI

महाराष्ट्रामध्ये होळीच्या दिवशी आज राजकीय धुळवडीचे देखील रंग पहायला मिळत आहेत. सामनाच्या अग्रलेखामध्ये आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर निशाणा धरत 'केवळ सेल्युट घेण्यासाठी नव्हे तर कणखर नेतृत्त्व देण्यासाठी गृहमंत्रीपद असतं' असा सल्ला दिला आहे. यानंतर आज गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) देखील मीडियाशी बोलताना त्यांच्यावर माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी होईल असे म्हटलं आहे. या चौकशी मध्ये सत्य समोर येईल असे त्यांनी म्हटलं आहे. शरद पावार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मात्र काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांची पाठराखण करत त्यांच्या राजीनाम्याची, चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं आहे. (नक्की वाचा: संजय राऊत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 'रोखठोक' मधून निशाणा; 'पोलिस खात्याचं नेतृत्त्व 'सेल्यूट' साठी नव्हे कणखर नेतृत्त्व देण्यासाठी' म्हणत सल्ला).

दरम्यान काही दिवसांपूर्वी सचिन वाझेंना मुंबईत 100 कोटींच्या वसुलीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आदेश दिल्याचा खळबळजनक दावा माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. त्यानंतर पोलिस दलातील बदल्यांसाठी पैसे मोजले जातात असा देखील अहवाल रश्मी शुक्ला या आयपीएस ऑफिसरने दिला आहे. त्यानंतर मुंबई आणि पोलिस खात्यामध्ये अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस दलावर प्रश्नचिन्ह उभं राहिल्यानंतर अनेक महत्त्वाच्या खात्यांमध्ये पोलिस कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये मुंबई पोलिस आयुक्त, महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा देखील समावेश आहे.