CM Uddhav Thackeray Mahad Visit: डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन करणार; तळीये करांनाही मदतीचं आश्वासन
डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये खेड, चिपळूण, महाड, कोल्हापूर, सातारा, सांगली भागात पावसाने झोडपून काढले आहे. यावेळी महाड मध्ये तळीये गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. सुमारे 42 जणांपेक्षा अधिक लोकांनी यामध्ये जीव गमावला असून अद्यापही अनेकजण बेपत्ता असल्याने तळीयेकर शोकसागरामध्ये आहेत. आज मुख़्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी या तळीये गावाला भेट दिली आहे. यावेळेस मीडीयाशी बोलताना त्यांनी कोकणात डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन करणार असल्याची माहिती दिली आहे तर तळीयेकरांनाही मदतीचे आश्वासन दिले आहे. नक्की वाचा: Maharashtra Flood: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पुरग्रस्त जिल्ह्यांना मिळणार मोफत राशन आणि केरोसिन.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्री एकनाथ शिंदे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, राज्याचे सचिव सीताराम कुंटे होते. महाडचा हवाई दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री तळीये गावामध्ये पोहचले होते. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत, ‘तुम्ही दुःखातून सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ’ अशी ग्वाही दिली आहे.
तळीये मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
दरम्यान ढगफुटी किंवा दरड कोसळण्याचा कुणी अंदाज व्यक्त करू शकत नाही. हवामान खातं अंदाज व्यक्त करू शकतं त्यामुळे जीव वाचवण्याला प्राधान्य असेल असे काल मुख्यमंत्री म्हणाले होते. कोकणातील मागील दोन वर्षाचा पावसाळ्यातील घटना, चक्रीवादळं पाहता आता यावर कायमस्वरूपी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यानुसार सरकार दरबारी काही निर्णय घेण्यास सुरूवात झाली आहे.
सध्या तळीये मध्येही यंत्रसामग्री अद्याप घटनास्थळी पोहचू शकलेली नाही त्यामुळे स्थानिकच एकमेकांना मदत करत बचावकार्य करताना दिसत आहेत. काल केंद्रीय यंत्रणांकडून, सेनेकडूनही महाराष्ट्राला पूरपरिस्थितीमधधून सावरण्यासाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.