OBC Reservation: विधिमंडळ अधिवेशनात ओबीसी आरक्षण मुद्द्यावरुन वादंग, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ आक्रमक, विधानसभा कामकाज स्थगित

या मुद्द्यावरुन आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) जोरदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session 2022) दुसरा दिवस आज ओबीसी आरक्षण (OBC Reservation) मुद्द्यावरुन जोरदार गाजतो आहे. या मुद्द्यावरुन आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) जोरदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका मांडण्यात आल्या. सभागृहातील गदारोळ वाढल्याने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभा कामकाज वीस मीनिटांसाठी स्थगित केले.

देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरुन आक्रमक भूमिका मांडत म्हटले की, राज्य सरकार म्हणून आपण आम्हाला नेहमीच सांगता की, ओबीसी आरक्षणाशिवाय एकही निवडणूक होणार नाही. होता कामा नये. पण असे केवळ आपण आम्हाला सांगत राहता. प्रत्यक्षात आरक्षणावर काहीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ आमचे (विरोधकांचे) समाधान करायचे म्हणून मंत्रिमंडळाचे ठराव करु नका. आगामी काळात दोन तृतियांश निवडणुका पार पडणार आहेत. जर या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडल्या तर लक्षात ठेवा ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे जर कायदा करायचा असेल तर तो तत्काळ करा. पटलावरील सर्व कामसाज बाजूला ठेऊन ओबीसी आरक्षणावर चर्चा करा, अशी मागणी फडणवीस यांनी या वेळी सभागृहात केली.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात ओबीसी आरक्षणावरुन आक्रमक भूमिका मांडली. या वेळी त्यांनी विरोधकांवर शेलक्या शब्दात टोलेबाजी केली. ओबीसी आरक्षणावर आपला शब्दा 'वाचवा' आहे. तो 'बुडवा' असा होईल असे काही करु नका, असे म्हणत छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ओबीसी आरक्षणावरन केवळ टीका टीप्पणी न करता सर्वांनी एकत्र यायला हवे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या कालच्या सुनावणीमध्ये ओबीसी आरक्षणास जोरदार धक्का बसला आहे. हे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला वेत असेही भुजबळ म्हणाले.