Maharashtra Budget 2023: 'लेक लाडकी' योजना ते आशा स्वयंसेविकाच्या मानधनात वाढ; पहा महिलांसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
देवेंद्र फडणवीस यांनी काल आर्थिक सर्वेक्षण अहवालासोबतच आज विधानसभेत बजेट सादर केले आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आज बजेट सादर केले आहे. शिंदे-फडणवीस सरकार मध्ये विधानसभेत देवेंद्र फडणवीस तर विधानपरिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. बजेट सादर करताना त्यांनी हा अर्थसंकल्प शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसीसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुतंवणुकीत पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती, सक्षम कुशल युवा आणि पर्यावरण पूरक विकास या 5 गोष्टींवर अवलंबून असेल असे जाहीर केले आहे. यामध्ये महिलांसाठी त्यांनी भरीव योजनांचा समावेश केला आहे. काल जगभर 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केल्यानंतर आज सादर झालेल्या बजेट मध्ये पहा महिलांसाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
महिलांसाठी अर्थसंकल्प 2023-24 मधील घोषणा
- महिलांसाठी खास योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये स्वयंसेविकेचे सध्याचे मानधन 3500 रुपये तर गटप्रवर्तकांचे मानधन4700 रुपये आहे या मासिक मानधनात प्रत्येकी दीड हजार रुपये वाढ जाहीर केली आहे.
- मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल असं देखील जाहीर करण्यात आले आहे.
- महिलांना एसटी बस सेवेमध्ये 50% सवलत
- महिलांच्या आरोग्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत चार कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येतील.
- राज्यातील अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची रिक्त असलेली सुमारे वीस हजार पदे भरण्यात येतील.
- बचत गटांच्या माध्यमातून ३७ लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये बांबू क्लस्टर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापुरी चप्पल क्लस्टर हे विकसित करण्यात येईल.
- केंद्र शासनाने अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे मुंबई येथे युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल, त्यामध्ये बचत गटांना जागा देण्यात येईल.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांसाठी देखील महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामासाठी भरीव घोषणा केली आहे. एकूण 19 हजार 400 कोटींची घोषणा केली आहे.