Maharashtra Board SSC Exam 2022: औरंगाबाद मध्ये आजी-नातवाने एकत्र दिला दहावीचा बोर्ड परीक्षेचा पेपर!
कोविड 19 निर्बंधांचे पालन करत यंदा 10वीची परीक्षा 4 एप्रिल पर्यंत पार पडणार आहे.
माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. शिकण्याला काही वयाचं बंधन नसतं. राज्यात सध्या शिक्षण मंडळाच्या 10वी, 12वी च्या परीक्षा सुरू आहेत. काल पासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा (SSC Board Exam) सुरू झाल्या आहेत. औरंगाबाद मध्ये काल 56 वर्षीय आजीबाईंनी नातवासोबत दहावीचा पहिला पेपर दिला आहे. या आज्जींचं नाव शेख हजराबी शेख असं आहे. त्या हर्सुलमध्ये राहतात.
कमी वयात झालेलं लग्न, घरची हालाखीची परिस्थिती यामुळे शेख हजराबी शेख यांना शिक्षण घेता आलं नव्हतं. पण शिक्षणाची आवड होती. त्यामुळे वयाच्या 56व्या वर्षी त्यांनी बोर्ड परीक्षांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नानंतर पतीने चौथीला प्रवेश मिळवून दिला होता. पण तेव्हाही शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. पण यंदा नातवासोबत त्यांनी दहावीचा पेपर दिला आहे. आजी-नातवाने अभ्यासही एकत्र केला.
चूल-मुल पुरता स्त्रियांचं आयुष्य बांधून ठेवणार्या समाजातील अनेक कुटुंबामध्ये महिला शिक्षणापासून दूर राहतात. पण यंदा बोर्डाच्या परीक्षेला अनेक महिलांनी त्यांचं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे आल्याचं पहायला मिळालं आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Board SSC Exam 2022: औरंगाबाद मध्ये 10वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट देण्यासाठी संस्थाचालकाकडून 30 हजार घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर; प्रत्यक्ष लाच घेताना अटक .
मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे शिक्षण ऑनलाईन पार पडलं आहे. दोन वर्षांत पहिल्यांदाच बोर्ड यावर्षी ऑफलाईन परीक्षा घेत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वातावरणामध्ये आता बोर्डाची परीक्षा पार पाडण्यासाठी मंडळाकडून खास नियमावली बनवण्यात आली आहे. कोविड 19 निर्बंधांचे पालन करत यंदा 10वीची परीक्षा 4 एप्रिल पर्यंत पार पडणार आहे.