Maharashtra Board HSC Exams 2021: 12 वी च्या विद्यार्थ्यांना दुहेरी दिलासा; अर्ज भरण्यास 28 जानेवारी पर्यंत मुदत सोबतच सुधारित विषय निश्चिती योजनेला ब्रेक

12 वीचे फॉर्म भरण्यास अजून 10 दिवसांचा कालावधी वाढवून देण्यासोबतच 11वीच्या ऑप्शनल विषयांमध्येच 12 वीची परीक्षा देण्याचा मोठा दिलासा शिक्षण मंडळाकडून देण्यात आला आहे.

HSC EXAM | Image used for representational purpose | Photo Credits: commons.wikimedia and unsplash.com

यंदा 12 वीची परीक्षा (HSC Exam) देणार्‍या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी शिक्षण मंडळाकडून पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार, आता एचएससी 2020-21 ची परीक्षा देणारे विद्यार्थी 28 जानेवारी पर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून निशुल्क फॉर्म भरू शकतात. त्यानंतर उशिर झाल्यास 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान लेट फी भरून अर्ज करता येणार आहे. प्रवेश अर्जाला मुदतवाढ देण्यासोबतच सरकरने यंदा 12 वीच्या विद्यार्थ्यांना ऑप्शनल विषयांबाबतही दिला आहे. 11 वीच्या ऑप्शन विषयांसहच 12 वीची देखील परीक्षा देता येईल असे सांगण्यात आले आहे. Maharashtra Board Exams 2021 Dates: 10 वी,12वीच्या यंदाच्या परीक्षेच्या तारखा आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता.

दरम्यान सुरूवातीला 15 डिसेंबर ते 4 जानेवारी दरम्यान फॉर्म भरण्याची मुभा होती. ती वाढवून 18 जानेवारी करण्यात आली होती. पण काही शाळा आणि ज्युनियर कॉलेज यांच्याकडून फॉर्म भरताना तांत्रिक त्रृटी जाणवत असल्याची तक्रार केल्यानंतर बोर्डाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे यंदा 12 वीची परीक्षा देणारे विद्यार्थी पुढील 10 दिवस फॉर्म भरू शकतील.

महाराष्ट्रामध्ये 9वी ते 12 वीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार यंदा पासून विषय निवडीबाबत सुधारित धोरण लागू करणं अपेक्षित होते. सुधारित विषय निश्चिती योजना अंतर्गत शाखानिहाय ए, बी, सी मध्ये विषय विभागले होते. तर काही विषय अभ्यासक्रमातून रद्द करण्यात आले होते. पण यंदा कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग बंद होते. यामुळे नव्या विषयाचा पुरेसा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना वेळ मिळाला नसावा यावरून आता विषय निवडीचं सुधारित धोरण यंदाच्या वर्षापुरता स्थगित केले आहे. या निर्णयामुळे देखील अनेक विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे. 12 वीचा फॉर्म भरताना 11 वीच्या विषयांसहच तो भरला जाऊ शक्तो.