Maharashtra Assembly Monsoon Session 2022: 'काळी दाढी, पांढरी दाढी', सत्ताधारी विरोधकांमध्ये टोलेबाजी; छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणात नर्मविनोदाची पेरणी

निमित्त ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची काळी (Black Beard), पांढरी दाढी (White Beard).

Chhagan Bhujbal, Narendra Modi, Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session 2022) सध्या सुरु आहे. विधिमंडळ सभागृहाचे कामकाज हा तसा मोठा रंजक विषय. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक विविध विषयांवर नेहमीच एकमेकांवर तुटून पडतात. दोन्ही बाजूच्या नेत्यांची भाषणे ही अलिकडे तशी एकमेकांवर टीका करणारीच असतात. मात्र, नेता जर ज्येष्ठ असे तर कधी कधी दोन्ही बाजूंनी भाषणादरम्यान टोलेबाजी आणि नर्मविनोदाची पेरणी होते. ज्यामुळे वातावरणातील ताण चांगलाच हलका होतो. आताही तसेच झाले. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील टोलेबाजीने सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. निमित्त ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची काळी (Black Beard), पांढरी दाढी (White Beard).

काय घडले नेमके?

विधिमंडळात विधानसभा सभागृहात कामकाज सुरु होते. हे कामकाज सुरु असताना एका विषयावरुन बोलताना छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. भुजबळ म्हणाले, “समोर मुख्यमंत्री बसले आहेत. मला मुख्यमंत्र्यांकडे बघून खूप आनंद झाला आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री झालात यासोबतच मला आनंद वेगळाच आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव फक्त महाराष्ट्रात आहे. सफेद दाढीचा प्रभाव दिल्लीपासून भारतभर आहे.” भुजबळ यांच्या या टीप्पणीमुळे सभागृहात एकच हशा पिकला.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीवरुनच भाष्य केल्यामुळे भाजपकडून त्याला उत्तर नाही आले तरच नवल. दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले. त्या वेळी देवेंद्र फडणीस यांनी छगन भुजबळ यांच्या टीप्पणीला प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना सगळे माफ आहे. पण मी इतकेच सांगतो की, पांढऱ्या दाढीला आमच्याकडे खूप रिस्पेक्ट आहे'. गमतीचा भाग असा की छगन भुजबळ यांचीही दाढी पांढरीच आहे. (हेही वाचा, Nitin Gadkari Funny Speech Video: 'खुर्ची जाण्याच्या भीतीने मुख्यमंत्री असमाधानी', नितीन गडकरी यांनी सांगीतले राजकारणातील वास्तव, पाहा विनोदी व्हिडिओ)

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही ही संधी सोडली नाही. त्यांनी म्हटले की, “मघाशी छगन भुजबळांनी सांगितलं की पांढरी दाढी, काळी दाढी. पांढऱ्याची काळी दाढी करतात असं मी ऐकलंय. पण काळ्याची पांढरी करायला लागली तरी करा, पण शेतकऱ्यांना मदत जाहीर करा.” अजित पवार यांच्या टीप्पणीवरही सभागृहाने जोरदार दाद दिली.