नाशिक शिवसेना पक्षात असंतोष, युतीला धक्का; 36 नगरसेवक, 350 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा युतीच्या जागावाटपात भाजपला सुटल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यामध्ये मोठा असंतोष होता. हा असंतोषच या राजीनामास्त्राने पुढे आल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Assembly Elections 2019: नाशिक पश्चिम विधानसभा (Nashik West Assembly Constituency) मतदारसंघात शिवसेना (Shiv Sena) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नाशिक महापालिकेतील 36 नगरसेवक आणि तब्बल 350 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. महत्त्वाचे असे की, राजीनामा दिलेल्या या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी बंडखोर उमेदवाराला पाठींबा दिला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा युतीच्या जागावाटपात भाजपला सुटल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यामध्ये मोठा असंतोष होता. हा असंतोषच या राजीनामास्त्राने पुढे आल्याचे बोलले जात आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद असल्याचा स्थानिक शिवसैनिकांचा दावा होता. त्यामुळे पक्षनेतृत्वाकडे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला घ्यावा अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांची होती. ही मागणी स्थानिक नेतृत्वाने अनेक वेळा पक्षनेतृत्वाच्या कानावर घालण्यात आली होती. मात्र, युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला सुटलाच नाही. या मतदारसंघातून युतीच्या उमेदवार म्हणून भाजपच्या सीमा हिरे या रिंगणात आहेत.
दरम्यान, उमेदवारी न मिळालेल्या अनेक ठिकाणी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले आहेत. खास करुन नवी मुंबई आणि कल्याण येथे शिवसैनिकांनी राजीनामे दिले आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील राजीनामास्त्रावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, नाशिक पश्चिम हा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडावा असा, आग्रह आम्ही भाजपकडे धरला होता. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला नाही. पदाधिकारी आणि नगरसेवकांनी दिलेल्या राजीनाम्याबाबतची माहिती आपण पक्षप्रमुखांना देऊ. या राजीनाम्यावर काय भूमिका घ्यायची हे पक्षनेतृत्वाशी चर्चा करुन निर्णय जाहीर करु, असे राऊत यांनी या वेळी सांगितले.
दरम्यान, बंडखोरी होणे किंवा नाराजी असणे हे केवळ नाशिक पश्चिम मतदारसंघातच झाले नाही. तर, इतर मतदारसंघातही युतीधर्मात बंडखोरी झाली आहे, याकडेही संजय राऊत यांनी लक्ष वेधले. (हेही वाचा, शिवसेना पक्षात बंडाळी की नाराजी? ऐरोली, बेलापूर मतदारसंघातून 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे 'मातोश्री'वर दाखल)
राजीनामास्त्रावर प्रतिक्रिया देताना युतच्या उमेदवार सीमा हिरे म्हणाल्या, युती धर्माचे पालन करण्यासाठी शिवसेना-भाजप अशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करायला हवे. नाशिक जिल्ह्यातून युतीचे सर्वाधीक उमेदवार कसे निवडूण आणता येतील यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करायला हवे. काही ठिकाणी नाराजी आहे. पण, ती पक्षाच्या नजरेसमोर आणून दिली जाईल. पक्षनेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली या नाराजीवर तोडगा काढण्यात येईल, असेही सीमा हिरे यांनी यावेळी सांगितले.