Maharashtra Assembly Elections 2024: 'स्वबळावर निवडणूक लढवा, शरद पवार यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ वापरू नये'; सर्वोच्च न्यायालयाचे Ajit Pawar गटाला निर्देश
मतदारांनी गोंधळून जाऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मतदारांना आपला उमेदवार स्पष्टपणे निवडता यावे यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन गटांमधील वादाच्या संदर्भात बुधवारी (14 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार (Ajit Pawar) गटाला फटकारले. महाराष्ट्राच्या निवडणुकीत शरद पवार यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ वापरू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले. अजित पवार गटाला स्वतःची ओळख घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
अजित पवार यांनी त्यांच्या समर्थकांना शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ निवडणूक प्रचारात दाखवू नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मतदारांनी गोंधळून जाऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. मतदारांना आपला उमेदवार स्पष्टपणे निवडता यावे यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. आपण राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाचे आहोत हे मतदारांना कळावे यासाठी दोन्ही गटांनी पुरेशी पावले उचलली पाहिजेत. न्यायालयाने अजित पवार यांना त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना शरद पवारांची छायाचित्रे आणि व्हिडिओ वापरू नयेत असे निर्देश दिले.
शरद पवार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पोस्टर्स आणि सोशल मीडियावरील पोस्टचे पुरावे न्यायालयात सादर केले. राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांची छायाचित्रे वापरली असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे मतदारांचा कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून हे थांबवावे, अशी विनंती सिंघवी यांनी न्यायालयाला केली. अजित पवारांचा गट शरद पवारांच्या प्रतिमेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात केला. (हेही वाचा: Maharashtra Elections 2024: मुंबईच्या महायुतीच्या उमेदवारांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षात 150% वाढ, तर MVA उमेदवारांची संपत्ती अवघ्या 20 टक्यांनी वाढली- Informed Voter Project)
ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी हे आरोप खोटे ठरवले आणि निवडणूक प्रचारात असे कोणतेही फोटो वापरले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की आजच्या एआयच्या युगात फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करणे सोपे आहे. यावर न्यायालयाने संतुलित भूमिका घेत एआयच्या वाढत्या वापरामुळे अशा बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, एआयद्वारे फोटोशी छेडछाड होण्याचा धोका वाढला असून त्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. मतदार स्वतः हुशार असून ते कोणत्याही गोंधळाला बळी पडणार नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने अजित पवार गटाला स्वबळावर उभे राहून पक्षाचा निवडणूक प्रचार स्वबळावर चालवायला सांगितले.