महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: काँग्रेस कडून निवडणूक आयोगाकडे राज्यात EVM मशीन बिघडल्याच्या 65 तक्रारी दाखल

परंतु याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदानावर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे.

EVM Machine (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रात आज (21 ऑक्टोबर) विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडत आहे. परंतु याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदानावर त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) कडून निवडणूक आयोगाकडे (Election Commission) राज्यात ईव्हीएम (EVM) बंद पडल्याच्या 65 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. परंतु औरंगाबाद येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने या ठिकाणी मतदान उशिराने सुरु करण्यात आले. तसेच मतदाने काम काही तासांसाठी बंद करण्यात आले होते. त्याचसोबत सिंदखेडराजा मधील देऊळगाव बुथ क्रमांक 205 येथे मतदानापूर्वीच ईव्हीएममध्ये बिघाड झाला. येथील ईव्हीएम मशीन जवळजवळ 1 तास बंद होती. दुसऱ्या बाजूला रुकडी मध्ये बुथ क्रमांक 219 मध्ये VVPAT मशीन काम करत नसल्याने गोंधळाची स्थिती दिसून आली. एवढेच नाही तर राज्यात विविध ठिकाणी पडत असलेल्या पावसाचा फटका मतदानावर झाला आहे.

तसेच सांगलीतील इस्लामपूर मध्ये ईव्हीएम मशीन बंद झाले होते. इस्लामपूर हे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे. त्याचसोबत साखराळे मध्ये ही ईव्हीएम बंद झाल्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा मतदान सुरु करण्यात आले. वर्धामध्ये ही ईव्हीएम मशीन बंद पडले होते. या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पुण्यात शिवाजीगर विद्याभवनात वीज गायब झाल्याने अंधारात मतदारांनी मतदान केले.(महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 Live Updates: नांदेडमध्ये वंचितच्या उमेदवारावर हल्ला, तर बोगस मतदारांमुळे बीडमध्ये क्षीरसागर काका- पुतण्यामध्ये राडा)

विधानसभा निवडणूकीचा निकाल येत्या 24 ऑक्टोबरला जाहीर केला जाणार आहे.विधानसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी याकरिता राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात ठेवण्यात आले आहे, तसेच मतदानाच्या दोन दिवस आधीपासून मद्य विक्री बंद ठेवण्यात आली असल्याने अतिउत्साही कार्यकर्त्यांवर चाप बसवण्यात आला आहे. याच प्रमाणे 9000 हुन अधिक मतदान केंद्राच्या परिसरात लाईव्ह वेबकास्टिंगची सोय करण्यात आली आहे.