कोणतंही टेन्शन नाही पण, उत्सुकता आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही फोनवरुन दिल्या शुभेच्छा: आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे हे निवडणूक लढविणारे पहिलेच ठाकरे (शिवसेना) ठरले आहेत. आदित्य ठाकरे यांची उमेदवारी वरळी विधानसभा मतदारसंघातून जाहीर होताच शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच आदित्य यांचा विजय निश्चित असल्याचा दावा शिवसैनिक करत आहे.

कोणतंही टेन्शन नाही पण, उत्सुकता आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही फोनवरुन दिल्या शुभेच्छा: आदित्य ठाकरे
Yuva Sena Chief Aditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) वरळी विधानसभा (Worli Vidhan Sabha) मतदारसंघातून आज निवडणूक अर्ज दाखल करत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीने शिवसेना पक्षात मोठा उत्साह असून, शिवसैनिक जल्लोष करत आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे हे निवासस्थान मातोश्री येथून बाहेर पडले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी अल्पावधीतच ते निवडणूक कार्यालयात दाखल होतील. दरम्यान, तत्पूर्वी आदित्य यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले 'लोकांच्या प्रेमातूनच मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीला सामोरे जाताना मला कोणतेही टेन्शन नाही. पण, उत्सुकता कायम आहे.' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज विशेष आठवण येते आहे', असेही आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले.

'आता जनतेचे आशीर्वाद घेणार '

या वेळी आदित्य यांना प्रसारमाध्यमांनी विचारले की, निवडणूक अर्ज दाखल करण्यास निघण्यापूर्वी कोणास भेटलात काय? यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, अर्थातच, घरातून बाहेर पडताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले. आई-वडील, आजी आणि मावशी तसेच घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. आता जनतेचे आशीर्वाद घेणार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन शुभेच्छा दिल्या

अर्ज दाखल करण्यासाठी आपल्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस येणार अशी चर्चा आहे, असे विचारले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फोनवरुन शुभेच्छा दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

शिवसैनिकांमध्ये जल्लोष 

दरम्यान, वरळी येथे शिवसेना ज्येष्ठ नते, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे शिवसैनिकांमध्ये जल्लोष आहे. आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी पुरुष शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर वरळीत दाखल आहेतच. परंतू, महिला शिवसैनिक तसेच ज्येष्ठ आणि वृद्ध शिवसैनिकही उपस्थित आहेत. (हेही वाचा, विधानसभा निवडणूक 2019: आदित्य ठाकरे आज दाखल करणार उमेदवारी अर्ज; पदयात्रेच्या निमित्ताने शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन)

आदित्य ठाकरे ट्विट

निवडणूक लढविणारे पहिलेच ठाकरे (शिवसेना) 

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असलेल्या ठाकरे कुटुंबियातील आजवर एकाही व्यक्तीने निवडणूक लढवली नव्हीत. निवडणूक न लढवता सत्तेचा रिमोट आपल्या हाती ठेवायचा ही बहुदा ठाकरे घराण्याची परंपराच झाली होती. मात्र, आदित्य ठाकरे यांनी ही परंपरा मोडीत काढत प्रत्यक्ष निवडणुकीस समोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आदित्य ठाकरे हे निवडणूक लढविणारे पहिलेच ठाकरे (शिवसेना) ठरले आहेत. आदित्य ठाकरे यांची उमेदवारी वरळी विधानसभा मतदारसंघातून जाहीर होताच शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच आदित्य यांचा विजय निश्चित असल्याचा दावा शिवसैनिक करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2019 10:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).