IPL Auction 2025 Live

Mumbai Local Update: सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात आज घोषणा होण्याची शक्यता

रिपोर्टनुसार, महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा मुद्दा चर्चिला केला जाईल.

Mumbai Local | Photo Credits: Unsplash.com

सर्वसामान्यांसाठी लवकरच मुंबई लोकल (Mumbai Local) सेवा सुरु होऊ शकते, असे आशादायी संकेत मिळू लागले आहेत. रिपोर्टनुसार, महाराष्ट्र मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा मुद्दा चर्चिला जाईल. यातून सकारात्मक निर्णय पुढे येईल, अशी आशा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

"आम्ही सध्या लोकल ट्रेन सर्व्हिसेस चालवत आहोत. आम्हाला लोकलसेवा पूर्णपणे सुरु करण्यात कोणतीही अडचण नाही. परंतु, आम्ही राज्य सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत. यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी आशा आहे," असे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरु करण्यासंदर्भात कोणतीही चर्चा आमच्यासोबत झालेली नाही, असे भारतीय रेल्वेने मंगळवारी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

गेल्या वर्षी 23 मार्च रोजी कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर 15 जुलै रोजी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरु करण्यात आली.  दरम्यान, 20 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांनाच पश्चिम आणि मध्य रेल्वेने प्रवास करण्याची मुभा होती. यासाठी क्युआर कोड मेकॉनिजन वापरले जात होते.

23 ऑक्टोबर पासून महिलांना देखील लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळाली. मात्र महिलांसोबत लहान मुलांना लोकल ट्रेनमध्ये प्रवेश मिळत नव्हता. याशिवाय वकील, अपंग आणि कॅन्सर रुग्णांना लोकलने प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली आहे. मात्र सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा कधी सुरु होणार, या प्रतिक्षेत मुंबईकर आहेत. त्यामुळे आज नेमकी काय घोषणा केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राप्त माहितीनुसार, लोकलसेवा सुरु करण्यासाठी सरकार चेन्नई पॅटर्नचा अवलंब करणार असल्याचे बोलले जात आहे.  पॅटर्ननुसार, महिलांना पूर्णवेळ आणि उर्वरीत प्रवाशांना गर्दीची वेळ वगळता प्रवास करण्याची परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वीही अनेकदा मुंबई लोकल सर्वांसाठी खुली होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.