Maha Awas Yojana: राज्यात महाआवास अभियानास 1 मे 2021 पर्यंत मुदतवाढ; साडेचार महिन्यात 7,41,000 हजार घरकुलांची बांधकामे

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी, 20 नोव्हेंबर 2020 पासून 31 मार्च 2021 या साधारण साडेचार महिन्यांच्या कालावधीत ‘महाआवास अभियान’ (Maha Awas Abhiyan) राबवण्यात आले

Maha Awas Yojana: राज्यात महाआवास अभियानास 1 मे 2021 पर्यंत मुदतवाढ; साडेचार महिन्यात 7,41,000 हजार घरकुलांची बांधकामे
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (PC - Twitter)

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी, 20 नोव्हेंबर 2020 पासून 31 मार्च 2021 या साधारण साडेचार महिन्यांच्या कालावधीत ‘महाआवास अभियान’ (Maha Awas Abhiyan) राबवण्यात आले. या अभियानास चांगले यश मिळाले आहे. प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांमधून अभियान कालावधीत, राज्यात 7,41,545 घरकुलांचे बांधकाम करण्यात आले असून, त्यापैकी 3,00,621 घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली आहेत, तर 4,40,924 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथवर आहे. ग्रामीण भागात अभियानाला मिळालेले यश पाहता अभियानास 1 मे 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले.

मुश्रीफ म्हणाले, प्रगतीपथावर असलेल्या घरकुलांपैकी 2,82,232 घरकुलांचे बांधकाम जोत्यापर्यत (प्लिंथपर्यंत) तर, 1,58,692 घरकुलांचे बांधकाम लिंटेलपर्यंत झाले असून, ही घरकुले या महिन्यात पूर्ण होत आहेत. अभियान कालावधीत 42,657 भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, उर्वरित 63, 343 भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाभार्थ्यांना आदर्श घरकुलांबाबतची माहिती करून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे डेमो हाऊसेसची उभारणी करण्याचे काम सुरू आहे.

घरकुल बांधणीबरोबरच लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. यामध्ये घरकुलासोबत शौचालयाचा लाभ, नळाद्वारे पाणीपुरवठ्याचा लाभ, गॅस जोडणीचा लाभ, वीज जोडणीचा लाभ, लाभार्थ्यांना उपजिवीकेचे साधन मिळवून देण्यासाठी काम करणे याचा समावेश आहे. (हेही वाचा: जालना जिल्ह्यात प्रत्येक पंधरा दिवसानंतर केली जाणार कामगारांची कोरोनाची तपासणी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश)

अभियानामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांचाही समावेश करण्यात आला असून, यामध्ये पुरेशी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारती निर्माण करण्यात येत आहेत. आजअखेर 921 बहुमजली इमारतींची (जी+2) निर्मिती करण्यात आली  आहे. तसेच जेथे पुरेशी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी सर्व सोयीसुविधांनी युक्त 193 गृहसंकुल उभारण्यात आले आहेत. तसेच लाभार्थ्यांना अधिक सोयीसुविधायुक्त घरकुल बांधकामासाठी बँकेचे 70 हजार रुपये कर्ज स्वरुपात मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, आजअखेर 2,172 लाभार्थ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2021 10:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).