Maha Awas Abhiyan: खुशखबर! आता गरीब, गरजू, बेघर लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार पूर्ण; राज्यात महा आवास अभियानाचा शुभारंभ, जाणून घ्या सविस्तर
महाआवास अभियान 20 नोव्हेंबर 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. जागा नसलेल्या कुटुंबांना घरकुले देण्यामध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी देशात अव्वल आहे. या अभियानाच्या माध्यमातून बांधकाम अपूर्ण असलेली, मंजूर असलेली मात्र बांधकाम सुरू नसलेली घरकुले पूर्ण केली जातील.
राष्ट्रीय आवास दिनानिमित्त 31 मार्च 2024 पर्यंत ‘महा आवास अभियान 2023-24’ (Maha Awas Abhiyan) राज्यभर राबविण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वत:चे घर असावे, हे स्वप्न असते. गरीब, समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्ती यांना, तर घरकुल म्हणजे स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी केंद्र व राज्य शासन घरकुलांच्या विविध योजना राबविते. या योजनांच्या समन्वयातून राज्य शासनाने महाआवास अभियानाचा शुभारंभ केला आहे. महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीतून लाभार्थ्याच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी आज केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाआवास अभियान 2023-24 राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ व सन 2021-22 चे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयेाजन करण्यात आले.
राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘महा आवास अभियान 2023-24’ या अभियानामुळे 10 लाख गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मंत्री महाजन म्हणाले की, अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांपैकी निवारा देण्याचे चांगले काम यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने गंभीरतेने या कामाकडे लक्ष देऊन काम पूर्ण करावे. घरांचे बांधकाम दर्जेदार करावे. केवळ घरकूलच नाही, तर अन्य योजनांचा लाभसुद्धा घरकुल लाभार्थ्याला देण्यात यावा.
प्रधान सचिव डवले म्हणाले की, महाआवास अभियान 20 नोव्हेंबर 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यात येणार आहे. जागा नसलेल्या कुटुंबांना घरकुले देण्यामध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी देशात अव्वल आहे. या अभियानाच्या माध्यमातून बांधकाम अपूर्ण असलेली, मंजूर असलेली मात्र बांधकाम सुरू नसलेली घरकुले पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘सर्वांसाठी घरे-2024’ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढविणे हा या अभियानाचा हेतू आहे. (हेही वाचा: Mumbai International Festival: येत्या 20 ते 28 जानेवारी दरम्यान 'मुंबई फेस्टिव्हल 2024' आयोजन; संस्कृती, संगीत, नृत्य, चित्रपट, खाद्यसह अनेक कार्यक्रमांची रेलचेल, घ्या जाणून)
या अभियान कालावधीत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरित करणे, सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले (Delayed Houses) पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, बहुमजली इमारती, गृहसंकुले व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे, डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे, शासकीय योजनांशी कृतीसंगम (Convergence) करणे, नावीन्यपूर्ण उपक्रम (Innovations/Best Practices) राबविणे, इ. 10 उपक्रम राबविण्यात येत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री महाजन यांनी केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)