IPL Auction 2025 Live

Loudspeaker Row: राज ठाकरे यांची 4 मे पासून हनुमान चालीसाचे पठण करण्याची धमकी; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले कारवाईचे संकेत

वळसे-पाटील पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिली आहे, तर रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत बंदी घातली आहे आणि प्रत्येक नागरिक, राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे.

Dilip Walse Patil | (Photo Credits: Facebook)

मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा, लाऊडस्पीकर न हटवल्यास पक्षाचे कार्यकर्ते 4 मेपासून हनुमान चालीसाचे पठण करतील, अशी धमकी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राच्या गृहखात्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सक्षम असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही सांगण्यात आले आहे. यावेळी देशभरात जातीय आणि धार्मिक धर्तीवर समाजाचे विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (HM Dilip Walse-Patil) यांनी केला.

दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला शांतता तसेच जातीय आणि सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. वळसे-पाटील यांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, त्यांनी मंगळवारी राज्याचे पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे, यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा मनसेचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रणनीती ठरवली जाईल. यासह औरंगाबादचे पोलीस आयुक्त राज ठाकरे यांचे काळाचे रेकॉर्ड केलेले भाषण पाहतील आणि त्यांनी रॅलीला परवानगी देताना घातलेल्या अटींचे पालन केले की नाही ते पाहतील.

त्यानंतर औरंगाबादचे पोलीस आयुक्त वरिष्ठांना अहवाल सादर करतील आणि तो मंगळवारच्या बैठकीत चर्चेसाठी उपलब्ध होईल. औरंगाबाद पोलीस प्रमुखांच्या अहवालावर योग्य ती चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर कारवाईचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असे ते म्हणाले. मंत्र्यांनी सांगितले की, ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, तसेच राज्यातील जनतेने शांतता राखावी, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत करावी. इतर गोष्टींसाठी पोलीस सक्षम आहेत. (हेही वाचा: 'नवाब मलिक यांची जामीन याचिका म्हणजे कायद्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न'; ईडीचे न्यायालयात उत्तर)

वळसे-पाटील पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाने सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिली आहे, तर रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत बंदी घातली आहे आणि प्रत्येक नागरिक, राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे. राज ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. राज ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशिवाय कोणताही आदेश देण्याचा अधिकार नाही. यावेळी, राज ठाकरेंकडे महाराष्ट्रासाठी कोणताही अजेंडा किंवा कृती आराखडा नसल्याने ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत असल्याचा दावा वळसे-पाटील यांनी केला.