Loudspeaker Controversy: 2,400 पैकी फक्त 24 मंदिरांनी घेतली लाऊडस्पीकरसाठी परवानगी; मुंबई पोलिसांची माहिती

याप्रकरणी पोलिसांनी रॅलीच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल केला होता

Loudspeaker | Representational Image (Photo Credits: Pixabay)

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात लाऊडस्पीकरबाबतचा (Loudspeakers) मुद्दा चर्चेत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींच्यावरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर आज ज्या मशिदींवर लाऊडस्पीकर चालू होते त्या ठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. मुंबई पोलिसांनी सांगितले की शहरातील 2400 मंदिरांपैकी आतापर्यंत केवळ 24 मंदिरांनी मंदिर परिसरात लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी मागितली आहे. राज्यात विविध समाजातील धार्मिक नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर चर्चा केली.

मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘शहरातील 2400 मंदिरांपैकी 24 मंदिरांनी लाऊडस्पीकरसाठी परवानग्या घेतल्या आहेत. 1140 मशिदींपैकी 950 मशिदींनी लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी घेतली आहे. आम्ही विनंती करतो की, जर लाऊडस्पीकर वापरायचा असेल तर केवळ मंदिरे आणि मशिदींनीच नाही तर इतर धार्मिक स्थळांनीही लाऊडस्पीकरसाठी परवानगी घ्यावी.’ बुधवारी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही मोठी घटना घडली नाही, त्यांनी सांगितले.

शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांच्या घराबाहेर मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करत असताना एक महिला पोलीस हवालदार खाली पडली. या हवालदाराच्या डोक्याला आणि खांद्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आवश्यक कारवाई करण्याचे आदेश शिवाजी पार्क पोलिसांना देण्यात आले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा: 'सर्व बेकायदेशीर लाऊडस्पीकर काढून टाकेपर्यंत मशिदीबाहेर हनुमान चालीसा वाजवत राहू'- मनसे अध्यक्ष राज ठाकरे)

मुंबईत कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनीही शहरातील काही ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानाबाहेरदेखील मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, राज ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद येथील सभेत केलेल्या भडकाऊ भाषणाप्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रॅलीच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रजनीश सेठ यांनी मंगळवारी सांगितले की, औरंगाबादचे पोलीस आयुक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या विरोधात केलेल्या भाषणाबद्दल योग्य कायदेशीर कारवाई करतील. शिवाजी पार्क पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी राज ठाकरे यांना कलम 149 अंतर्गत नोटीस बजावली होती.