IPL Auction 2025 Live

Lok Sabha Elections 2024: महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला 5 जागा देऊ केल्या; प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

ते म्हणाले, 'जो पक्ष संविधान बदलण्याबाबत भाष्य करत आहे, त्याला कोणीही मदत करू नये, अशी आमची इच्छा आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांची युती होणार असल्याची चर्चा गेले काही दिवस होती, मात्र आता चित्र काहीसे वेगळे दिसत आहे. जागावाटपामध्ये मतभेद झाल्याने प्रकाश आंबेडकर स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या बातम्या येत आहेत. अशात वंचित बहुजन आघाडी नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीसोबत जागावाटपाच्या चर्चेदरम्यान पाठीत 'वार' केल्याचा आरोप केला होता. यावर आता संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

राऊत म्हणाले, 'जागा वाटपाच्या मुद्द्यावर माझ्यावर टीका करण्यात काही अर्थ नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना व्हीबीएने एमव्हीए युतीचा भाग असावा अशी इच्छा होती. आम्ही त्यांना पाच जागा देऊ केल्या. आम्ही त्यांच्यासाठी अकोला आणि रामटेक लोकसभा जागा सोडण्यास तयार होतो. काँग्रेसनेही त्यांच्यासाठी चांगली ऑफर ठेवली होती.'

भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत होऊल असे काही करू नका, असे आवाहनही राऊत यांनी आंबेडकरांना केले. ते म्हणाले, 'जो पक्ष संविधान बदलण्याबाबत भाष्य करत आहे, त्याला कोणीही मदत करू नये, अशी आमची इच्छा आहे. ते पुढे म्हणाले, शरद पवार यांच्या निवासस्थानी आम्ही जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा केली नाही. वादग्रस्त जागा 'मैत्रीपूर्ण' लढल्या पाहिजेत असे आमचे मत आहे. येत्या 3 एप्रिल रोजी एमव्हीए आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून त्या परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील, अशी माहितीही राऊत यांनी दिली. (हेही वाचा: साताऱ्यात राजकीय तापमान वाढलं; कॉलर उडवून शरद पवारांचं एक प्रकारे उदयनराजेंना चॅलेंज)

दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते जरी वंचितला पाच जागा देणार असे सांगत असले तरी प्रत्यक्षात वंचितला तीनच जागा देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीकडून देण्यात आला होता, असे प्रकास आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, पाच जागा देण्याबाबत संजय राऊत भाष्य करत आहेत, मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही.