MVA Lok Sabha Seat Sharing Formula: महाविकासआघाडी जागावाटपाचे सूत्र ठरल्याची चर्चा, पाहा काय आहे फॉर्म्युला

महाविकासआघाडीमध्ये शिवसेना ( ठाकरे गट) 21, राष्ट्रवादी 19 आणि काँग्रेस 8 जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. उर्वरीत पाचसहा जागांवर मविआमध्ये काही मतभेद आहेत.

MVA Mumbai Morcha | (Photo Credit - Twitter/@ShivSena)

Lok Sabha Election 2023: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले महाविकासआघाडी सरकार कोसळ्यानंतर आणि शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर राज्यातील राजकारणाचे समीकरण प्रचंड बदलले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा (Loksabha Election 2024), विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय रणनिती आखली जात आहे. या रणनितीचा भाग म्हणूनच महाविकासआघाडी अधिक घट्ट झाली असून त्यांच्यात जागावाटपाचे सूत्रही (MVA Lok Sabha Seat Sharing Formula) ठरल्याची चर्चा आहे. महाविकासआघाडीमध्ये शिवसेना ( ठाकरे गट) 21, राष्ट्रवादी 19 आणि काँग्रेस 8 जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. उर्वरीत पाचसहा जागांवर मविआमध्ये काही मतभेद आहेत. त्यावर लवकरच तोडगा काढला जाणार आहे तसेच, काही जागांची आदलाबदलीही केली जाईल असे सांगितले जात आहे. दरम्यान, महाविकासआघाडी अथवा मविआच्या घटकपक्षांपैकी कोणाकडूनही या वृत्त अथवा चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. महाराष्ट्र हे देशातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले सर्वात मोठे दुसरे राज्य आहे. त्यामुळे सर्वच राष्ट्रीय पक्षांची या राज्यातील राजकीय घडामोडींवर बारीक नजर असते. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस गलीतगात्र झाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरीही फारशी समाधानकारक राहिली नाही. भाजप आणि शिवसेना मात्र अनुक्रमे 23 आणि 18 जागा घेऊन पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे पक्ष बनले. आता लोकसभा 2024 तोंडावर आली आहे. अशा वेळी, पुन्हा एकदा रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. त्यातही शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याने पुन्हा एकदा राजकारणाने वेगळी कलाटणी घेतली आहे. (हेही वाचा, महाविकास आघाडीच्या बैठकीत 'देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो' च्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे यांनी केली मिश्किल टिपण्णी (Watch Video))

लोकसभा निवडणूक 2019 निकाल

भाजप-23

शिवसेना- 18

राष्ट्रवादी काँग्रेस- 4

राष्ट्रीय काँग्रेस- 01

एमआयएम- 01

दरम्यान, भाजपच्या आक्रमक आणि तोडाफोडीच्या राजकारणाला रोखण्यासाठी महाविकासआघाडीने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच मविआची एक बैठक वायबीएम सेंटरमध्ये नुकतीच पार पडली. यातही मविआने एकत्र राहण्याचा निर्धार केला. त्यामुळे मविआकडून भाजपला रोखण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

दुसऱ्या बाजूला भाजपनेही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनिती आखलीआहे. भाजपने लोकसभा निवडणूक 2014 मध्ये 48 पैकी 45 जागा लढविण्याचे आणि जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या आणि राबविलेल्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे आदेशही भाजप नेतृत्वाने कार्यकर्त्यांना दिले आहेत. अशा वेळी आगामी लोकसभा निवडणुकीत जोरदार टक्कर पाहायला मिळणार हे नक्की.