Lockdown in Maharashtra? ओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होण्याची चर्चा; जाणून घ्या काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे

काल 8 हजार प्रकरणे नोंदवली गेली, आज 12 ते 15 हजार नवीन केसेस येऊ शकतात. ओमायक्रॉनची प्रकरणेही वेगाने समोर येत आहेत व ही चिंतेची बाब आहे'

Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वाधिक प्रभावित झालेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या नवीन 'ओमायक्रॉन' प्रकाराच्या धोक्यादरम्यान, मुंबईत दररोज नोंदवल्या जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत हजारांनी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोविड टास्क फोर्सची बैठक घेऊन राज्यातील परिस्थितीवर चर्चा केली. अशात राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लागू होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊनचे वृत्त फेटाळून लावले आहे.

महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉनची प्रकरणे अशीच वाढत राहिल्यास राज्यातील निर्बंध आणखी कडक केले जातील, मात्र लॉकडाऊन लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा मंत्रिमंडळात चर्चा झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राजेश टोपे म्हणाले की, ऑक्सिजनची आवश्यकता आणि सकारात्मकता दर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास निर्बंध कडक करण्याची गरज भासते. त्यामुळे इतक्या लवकर लॉकडाऊनची गरज नाही.’

त्यांनी मीडियाला विनंती केली की, लॉकडाऊनसारख्या बातम्या सांगून लोकांमध्ये भीती पसरवू नये. लॉकडाऊनबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नाही. ते पुढे म्हणाले की, ‘कोरोना आणि ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत आहेत परंतु आम्ही आतापर्यंत रेस्टॉरंट, थिएटर, शाळा आणि महाविद्यालये यांबाबत काही ठोस निर्णय घेतला नाही. संसर्ग आणखी वाढला तर कोरोनाचे निर्बंध वाढवले ​​जातील पण लॉकडाऊन लागू होणार नाही.’ (हेही वाचा: Omicron Variant: ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुणे विमानतळावर प्रवाशांमध्ये घट, अनेक उड्डाणे रद्द)

आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, 'कोरोनाचा संसर्ग दुप्पट वेगाने वाढत आहे. काल 8 हजार प्रकरणे नोंदवली गेली, आज 12 ते 15 हजार नवीन केसेस येऊ शकतात. ओमायक्रॉनची प्रकरणेही वेगाने समोर येत आहेत व ही चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या डेल्टा प्रकारात हॉस्पिटलायझेशन, मृत्यू, ऑक्सिजनची गरज इ. गोष्टी दिसून आल्या होत्या. परंतु ओमायक्रॉनचा प्रसार जरी खूप जलद असला तरी, रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता कमी आहे.