Karni Sena Vs Lawrence Bishnoi: लॉरेन्स बिश्नोई पुन्हा चर्चेत; करणी सेनेकडून 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर; निवडणूक लढवण्यासाठी राजकीय पक्षाकडून निमंत्रण
लॉरेन्स बिश्नोई याला चकमकीत ठार मारण्यासाठी करणी सेना या संघटनेने तब्बल 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, तर महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाने त्याला आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आमंत्रित केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Elections) सुरु असताना गुंड लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. एका बाजूला करणी सेना (Karni Sena) नामक संघटनेने बिश्नोई याचा एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर दुसऱ्या बाजूला एका राजकीय पक्षाने त्याला महाराष्ट्रातून निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) लढविण्यासाठी ऑफर ठेवली आहे. दोन परस्परविरोधी कारणांमुळे चर्चेत आलेल्या मुद्द्यांपैकी एक राजस्थानशी तर दुसरा महाराष्ट्राशीसंबंधीत आहे.
राज शेखावत यांनी जारी केला व्हिडिओ
राजस्थानमध्ये करणी सेना राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून बिश्नोईचा सामना करणाऱ्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला 1 कोटी, 11 लाख, 11 हजार, 111 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. शेखावत यांनी अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात, सुरक्षित भारत सुनिश्चित करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुन्हेगारांचा सामना करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. अशा गुन्हेगारांनी निर्माण केलेल्या भीतीपासून देशाला मुक्त करण्याच्या करणी सेनेच्या मोठ्या मागणीचा भाग म्हणून बिश्नोईच्या चकमकीचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा, तुरुंगात असलेल्या Lawrence Bishnoi वर कुटुंब दरवर्षी करते 40 लाखांचा खर्च; भावाने केला धक्कादायक खुलासा)
लॉरेन्स बिश्नोई याची शहीद भगतसिंग यांच्याशी तुलना
दरम्यान, महाराष्ट्रात एका स्थानिक राजकीय पक्षाने बिश्नोई यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी देऊन वाद निर्माण केला आहे. पक्षाच्या अध्यक्षांनी सध्या तुरुंगात असलेल्या बिश्नोई यांना पत्र लिहून राजकीय क्षेत्रात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. उत्तर भारतीय हक्कांसाठी लढणारी व्यक्ती म्हणून नेत्याने बिश्नोईची प्रशंसा केली, त्यांची तुलना शहीद भगतसिंग यांच्याशीही केली. या राजकीय हालचालीने व्यापक लक्ष वेधून घेतले आहे, मात्र या प्रस्तावाबाबत बिश्नोईकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळालेला नाही. (हेही वाचा, Somy Ali Writes to Lawrence Bishnoi: सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिचे लॉरेन्स बिश्नोई यास खुले पत्र, ' मुझे आपसे बात करनी है')
लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी संबधीत घटनांमुळे पुन्हा एकदा समाजात वेगळीच चिंता आणि चर्चा सुरु झाली आहे. कोणत्याही गुंडाचे एखाद्या राजकीय पक्षाने अशा प्रकारे उघडपणे समर्थन करावे का? त्याला उमेदवारी द्यावी का, आणि त्याचे उदात्तीकरण करावे का? त्याचा लोकशाहीवर काय परिणाम होईल, अशी चर्चा आहे. तर, दुसऱ्या बाजूला एखाद्या संघटनेने पोलिसांना अशा प्रकारे कोणाचा एन्काऊंटर करण्यासाठी बक्षीसाचे प्रलोभन दाखवणे किती योग्य आहे? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अभिनेता सलमान खान याला वारंवार दिल्या गेलेल्या जीवे मारण्याच्या धमक्या, राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या यांमुळे लॉरेन्स बिश्नोई टोळी चर्चेत आहे. या आधी याच गुंडाने पंजाबचा पॉप सिंगर सिद्दु मुसेवाला याची हत्या केल्याचाही आरोप आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)