गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी, अक्कलकोट, शेगावमध्ये भाविकांची तुफान गर्दी; चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी कमी वेळ
गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी आपले श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी, शेगाव, अक्कलकोट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
आज गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहण. हा दुर्मिळ योग तब्बल 149 वर्षांनंतर आपल्याला अनुभवता येणार आहे. गुरुपौर्णिमेचा उत्सव राज्यभरात अगदी उत्साहात साजरा केला जात आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी आपले श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी, शेगाव, अक्कलकोट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
शिर्डीतील साई संस्थानात गुरुपौर्णिमेनिमित्त चालणाऱ्या तीनदिवसीय उत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली. आज गुरुपौर्णिमेनिमित्त साईचरणी अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांच्या तुफान गर्दीमुळे व्हीआयपी पाससेवा बंद करण्याचा निर्णय साई संस्थानाने घेतला आहे. शिर्डीसोबत स्वामींची नगरी असलेल्या अक्कलकोटमध्ये आणि विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. (शिर्डी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त 15 ते 17 जुलै दरम्यान रंगणार श्री गुरुपौर्णिमा उत्सव, साईभक्तांनी येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक)
ANI ट्विट:
गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिराला फुलांची आरास आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसंच साई संस्थानकडून भक्तांच्या सुविधेसाठी अतिरिक्त निवास व्यवस्था, भोजन प्रसाद, सुरक्षेच्या काळजीसह दर्शनासाठी उत्तम व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरवर्षी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात येते. मात्र यंदा चंद्रग्रहणामुळे रात्री साई बाबांची शेजारती झाल्यानंतर साईमंदिर बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांना दिवसभरातच बाबांचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
त्याचप्रमाणे शेगाव येथील गजानन महाराजांचे मंदिर चंद्रग्रहणामुळे दुपारी दोननंतर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी काहीशी घाई करावी लागणार आहे.