Ladki Bahin e-KYC: लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज सुरू झाल्याचे खोटे मेसेज व्हायरल; DGIPR ने केला मोठा खुलासा

yojana.list या इन्स्टाग्राम अकाउंटवरून लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने अर्ज भरण्याची व प्रलंबित हप्ते मिळवण्याची लिंक शेअर केली जात असून, महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (डीजीआयपीआर) हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ladki Bahin Yojana Fake Post | X @MahaDGIPR

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)  ही महाराष्ट्रात पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेची लोकप्रियता आणि व्याप्ती मोठी असल्याने, याच नावाने अनेक बनावट अकाउंट्स आणि संदेश सोशल मीडियावर पसरवले जातात. अनेक महिलांची e-KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्याने किंवा अन्य त्रृटींमुळे हफ्ते रखडले आहेत.  प्रलंबित हप्ते मिळवण्यासाठी विशिष्ट ललिंक वर क्लिक करण्याचे आवाहन करणार्‍या काही बनावट, खोट्या लिंक्स समोर आल्या आहेत. यामुळे होणारी फसवणूक लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (डीजीआयपीआर) याबाबत तातडीने खुलासा केला आहे. डीजीआयपीआरने फसव्या दाव्यांचे खंडन केले असून, नागरिकांनी केवळ शासकीय अधिकृत स्रोतांवरूनच माहिती घ्यावी, असे वारंवार स्पष्ट केले आहे.

लाडकी बहीण योजने बाबत काय आहे व्हायरल दावा

इन्स्टाग्रामवरील yojana.list या अकाउंटवरून एक संदेश प्रसारित केला जात आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, प्रलंबित हप्ते मिळवण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरण्यास सांगितले जात आहे. या संदेशामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. नक्की वाचा: Ladki Bahin Yojana E-KYC: लाडकी बहीण योजना ई-केवायसीच्या नव्या मुदतीबाबत अधिकृत घोषणा नाही; लाभार्थींनी काय करावे? 

डीजीआयपीआरचा खुलासा

महाराष्ट्र डीजीआयपीआरने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून याबाबत स्पष्टीकरण देत हा संदेश खोटा असल्याचे जाहीर केले. संबंधित पोस्टमध्ये यंत्रणेने #FactCheck आणि #DGIPRFactCheck या हॅशटॅगसह हा दावा फेटाळून लावला. संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटच्या पोस्टवर 'फेक' असा स्पष्ट शिक्का मारून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

योजनेची सद्यस्थिती

डीजीआयपीआरने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत आधीच संपली असून, सध्या योजनेसाठी नवीन नोंदणी बंद आहे. त्यामुळे नव्याने अर्ज भरण्याचा किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

योजनेसंदर्भातील अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी नागरिकांनी केवळ ladakibahin.maharashtra.gov.in या शासकीय संकेतस्थळाचा आधार घ्यावा, असे आवाहन डीजीआयपीआरने केले आहे.

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

अशा प्रकारच्या बनावट संदेशांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची किंवा वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी सोशल मीडिया अकाउंटवरून येणाऱ्या योजनेसंबंधी लिंकवर क्लिक करू नये आणि अशा संशयास्पद पोस्ट्सची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement