Ladki Bahin Yojana: महिनाभराची प्रतीक्षा संपली! नवरात्री आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात

नवरात्रीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा प्रलंबित हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाने ३३९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

Ladki Bahin Yojana | ( (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नवरात्रीपूर्वी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र महिलांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हा हप्ता गेल्या महिनाभरापासून प्रलंबित होता. सामाजिक न्याय विभागाने यासाठी ३३९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्याचे 'सकाळ' चे वृत्त आहे.

निधी आणि वितरण प्रक्रिया

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटी १४ लाख रुपये मंजूर केले आहेत. हा निधी अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थी महिलांसाठी आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये या घटकासाठी एकूण ३,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याच तरतुदीतून हा निधी देण्यात आला आहे.

वृत्तांनुसार, प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर २४ सप्टेंबरनंतर निधी वितरणाचे आदेश काढण्यात आले. त्यानंतर थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरू झाली.

महिलांना काय करावे लागेल

ज्या महिलांचे बँक खाते आधारशी जोडलेले आहे आणि ई-केवायसी पूर्ण झाली आहे, त्यांच्या मोबाईलवर रक्कम जमा झाल्याचे एसएमएस येत आहेत. ज्यांना अद्याप संदेश मिळालेला नाही, त्यांनी आपल्या खात्याची स्थिती आणि ई-केवायसीची पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेत खरंच 1800 रुपये मिळणार? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य समोर .

महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी १ जुलै २०२४ पासून ही योजना सुरू केली आहे. यात पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै महिन्याचा हप्ता देण्यात आला होता. त्यानंतर ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न महिलांकडून विचारला जात होता. आता हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याने महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement