Kolhapur Sangli Highway Accident: कोल्हापूर-सांगली महामार्गावर रिक्षा आणि एसटी बसची समोरासमोर धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू

इचलकरंजी येथील रिक्षाचालकाच्या रिक्षामधून दोन महिला आणि दोन लहान मुलांना घेऊन श्रावण सोमवार निमित्त रामलिंग धुळोबा डोंगरातील मंदिराकडे निघाले असताना हा अपघात झाला.

Accident (PC - File Photo)

कोल्हापूर-सांगली महामार्गावर रामलिंग फाट्यावर सोमवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला आहे. रामलिंग फाट्यावर प्रवासी रिक्षा आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात रिक्षामधून प्रवास करणाऱ्या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या जावांसह एका लहान मुलाचा समावेश आहे. शिवानी घेवरचंद खत्री (वय 32), ललिता अंतराज खत्री (40) आणि श्रीतेज विलास जंगम (9) अशी मृतांची नावे आहेत. तर रिक्षाचालक प्रशांत पेटकर व कियान घेवरचंद खत्री गंभीर जखमी झाले आहेत.

इचलकरंजी येथील रिक्षाचालकाच्या रिक्षामधून दोन महिला आणि दोन लहान मुलांना घेऊन श्रावण सोमवार निमित्त रामलिंग धुळोबा डोंगरातील मंदिराकडे निघाले असताना हा अपघात झाला. हातकणंगलेहून महामार्गावरून रामलिंग फाट्याकडे वळण घेत असताना, कोल्हापूरहून आलेल्या कुडाळ-पंढरपूर एसटी बसने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की शिवानी आणि श्रीतेज दोघे जागीच ठार झाले. तर गंभीर जखमी ललिता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान मुख्य रस्त्यावरच हा अपघात झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी पहायला मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी पोहचले आणि बचावकार्य सुरु केले. तसेच वाहतुक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न देखील केला. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरून रामलिंग तीर्थक्षेत्राकडे जाण्यासाठी मार्ग आहे.