कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया हालणार; माजी खासदार धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यातून धक्का म्हणजे घरातून धक्का. कारण, याच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे कोल्हापूर (Kolhapur) येथील माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. येत्या 31 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात महाडिक यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. धनंजय महाडिक यांच्या भाजप (BJP) प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच नव्हे तर, शरद पवार यांनाही मोठा धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यातून धक्का म्हणजे घरातून धक्का. कारण, याच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती.
कोल्हापूर जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पर्यायाने शरद पवार यांचे विशेष प्रेम आहे. कोल्हापूर जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भक्कम पाया असे समिकरण गेली अनेक वर्षे कायम होते. 2014 लोकसभा निवडणुकीनंतर या समिरणाला पहिल्यांदाच प्रत्यक्ष धक्का बसला. कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच काँग्रेस आणि परिवर्तनवादी विचारांचा राहिला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातून नेहमीच डाव्या तसेच, काँग्रेस विचारांचा प्रभाव राहिला आहे. गेली अनेक वर्षे या ठिकाणाहून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडूण आला आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये (2014 नंतर) इथे शिवसेना, भाजप जोरदार मुसंडी मारताना दिसत आहेत.
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आणि पुरस्कृत उमेदवाराचा पराभव झाला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांचा पराभव शिवसेनेच्या संजय मंडलीक यांनी पराभव केला. तर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा पराभव झाला. राजू शेट्टी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. (हेही वाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत आमदार दिलीप सोपल म्हणणार 'जय महाराष्ट्र', 28 ऑगस्ट रोजी करणार शिवसेना प्रवेश)
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात वेगळे वारे वाहू लागल्याचे लोकसभा निवडणुकीतच दिसून आले होते. 'आमचं ठरलंय' हे वाक्य कोल्हापूरच्या राजकारणात मोठी खळबळ आणि बदल करणारे ठरले. दरम्यान, धनंजय मंडलीक यांचा होणारा भाजप प्रवेश हा शरद पवार यांच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. कारण, या आधी कोल्हापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा झालेला पराभवही पावर यांच्या असाच जिव्हारी लागला होता. सदाशिव मंडलीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर बराच काळ शरद पवार हे कोल्हापूरला आले नव्हते.