Pune Rains: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला

खडकवासला धरण जुलै महिन्यातच भरल्याने पुणेकरांची पाण्याची चिंता सध्या मिटली आहे.

Photo Credit- X

पुण्यामध्ये (Pune) मागील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान पुण्याच्या घाट परिसरातही धुव्वाधार पाऊस सुरू आहे. सध्या पुण्याला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) भरलं असून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी 6.30 पासून 4708 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे नदीपात्रात राहणार्‍या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. Khadakwasla Irrigation Department कडून नागरिकांना दक्ष राहण्याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत.

हवामान विभागाने पुण्याला व घाट विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी परिसरात देखील पावसाचा जोर वाढला असून यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने मध्यरात्री पासून खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये मध्य रात्री पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. खडकवासला धरण जुलै महिन्यातच भरल्याने पुणेकरांची पाण्याची चिंता सध्या मिटली आहे.