RERA Certificate Scam: रेरा प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी KDMC कडून विकासकांना दणका, बेकायदा 65  बांधकामे पाडणार

केडीएमसीने घोटाळ्यात सहभागी असलेल्या 65 बिल्डरांना नोटिसा बजावल्या आहेत आणि त्यांच्या सर्व बांधकामांशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

KDMC | (File Image)

रेरा प्रमाणपत्र घोटाळ्यात (RERA Certificate Scam) गुन्हा दाखल झालेल्या विकासकांची बेकायदा बांधकामे कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) पाडणार आहे. केडीएमसीने घोटाळ्यात सहभागी असलेल्या 65 बिल्डरांना नोटिसा बजावल्या आहेत आणि त्यांच्या सर्व बांधकामांशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. केडीएमसीचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले की, आम्ही प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत कारण जे बेकायदेशीर आढळले आहेत. ते पाडण्याची आमची योजना आहे.

वॉर्ड अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या असून बांधकाम व्यावसायिकांना 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास ही इमारत अनधिकृत ठरवून ती पाडण्यात येईल.  या 65 बांधकाम व्यावसायिकांचे शहरात एकूण 65 प्रकल्प आहेत. ज्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून रेरा प्रमाणपत्र घेतले होते. या व्यावसायिकांचे आणखी काही प्रकल्प आहेत का ते देखील आम्ही तपासत आहोत. तसे काही असेल तर त्यांना त्याचे तपशील सादर करण्यास सांगितले आहे, असेही दगडे म्हणाले. (हेही वाचा, Illegal Constructions In KDMC: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांची संख्या वाढली)

दरम्यान, 40 बिल्डरांची बँक खाती गोठवणाऱ्या या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ठाण्याच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आता उर्वरित 25 विकासकांचे तपशील संबंधित बँकांकडे कारवाईसाठी सादर केले आहेत. या संपूर्ण घोटाळ्याचे प्रमाण तपासण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांचा तपशील सादर करण्यासही या पथकाने KDMC ला सांगितले आहे.