कल्याण: कानात हेडफोन लावून रेल्वेरुळ ओलांडणाऱ्या तरुणीला ट्रेनची धडक बसल्याने मृत्यू
मात्र लोकल पकडण्यासाठी जी चढाओढ पहायला मिळते त्यात जीव गेल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर रेल्वेरुळ ओलांडू नये अशी सक्त ताकिद सुद्धा दिली जाते
मुंबईच्या लोकलने दिवसातून हजारोंच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. मात्र लोकल पकडण्यासाठी जी चढाओढ पहायला मिळते त्यात जीव गेल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर रेल्वेरुळ ओलांडू नये अशी सक्त ताकिद सुद्धा दिली जाते. तरीही नागरिक शॉर्टकट म्हणून रेल्वेरुळ ओलांडताना दिसून येतात. अशाच पद्धतीची घटना कल्याण येथे घडली आहे. कानात हेडफोन आणि रेल्वेरुळ ओलांडणे एका तरुणीच्या जीवावर बेतले असून तिला ट्रेनची जोरदार धडक बसल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
अनु दुबे असे तरुणीचे नाव आहे. कल्याण येथे स्थानकात भिंत बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.यामुळे काहीजण पुलाच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी भिंत नसलेल्या पायवाटेचा वापर करतात. याच मार्गाने अनु सुद्धा जात होती. मात्र तिच्या कानात हेडफोन असल्याने तिला रेल्वे येत असल्याचे न दिसल्याने धडक बसली. यामध्ये अनु हिचा जागीच मृत्यू झाला.(रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! धुक्यामुळे ट्रेनला उशीर झाल्यास SMS द्वारे आधीच मिळणार माहिती)
तर काही दिवसांपूर्वीच अनिल कुमार नावाच्या एक प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या ठिकाणी जात होता. मात्र समोरुन लोकल आल्याने त्याला वाचवण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्याने धाव घेत त्याचे प्राण वाचवले आहेत. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला होता. तसेच मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. त्यामुळे ठरलेली लोकल पकडण्यासाठी अनेकदा धावपळ करताना रेल्वेचा रूळ ओलांडला जातो. यामध्ये हकनाक बळी जाणार्या मुंबईकरांची संख्या देखील मोठी आहे. मात्र काही मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडणं हे जीवावर बेतू शकतं हा संदेश देण्यासाठी 7 नोव्हेंबरला चक्क पश्चिम रेल्वेने 'यमदूत' रेल्वेच्याच्या रूळांवर उतरवला होता.