Kaizzad Capadia Passes Away: फिटनेस इंडस्ट्रीवर दुःखाची कळा; K11 संस्थेचे प्रमुख, लोकप्रिय Fitness Trainer कैझाद कपाडिया यांचे निधन
के 11 (K 11) या शिक्षण संस्थेचे प्रमुख तसेच आंतरराष्ट्रीय फिटनेस ट्रेनर कैझाद कपाडिया (Kaizzad Capadia) यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले आहे.
भारताच्या फिटनेस इंडस्ट्रीवर (Fitness Industry) दुःखाची कळा पसरली आहे. के 11 (K 11) या शिक्षण संस्थेचे प्रमुख तसेच आंतरराष्ट्रीय फिटनेस ट्रेनर कैझाद कपाडिया (Kaizzad Capadia) यांचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कैझाद यांच्याकडून फिटनेस ट्रेनिंग घेतली आहे. यातील एक महत्वाचे नाव म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफ, अमिषा पटेल. कैझाद हे अनेक वर्षे टायगरचे फिटनेस ट्रेनर होते. कैझाद यांचे बुधवारी निधन झाले. त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांनी अजून तरी त्यांच्या मृत्यूचे कारण सांगितले नाही. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मिडियावर कैझाद यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
फिटनेस इंडस्ट्रीमध्ये कैझाद हे फार मोठे नाव होते. त्यांनी अनेक लोकांना ट्रान्सफॉर्म केले आहे. कैझाद यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला असून, इंडस्ट्री सध्या शोकात आहे. ‘कैझाद यांचे जाणे हे फिटनेस उद्योगाचे खूप मोठे नुकसान आहे,’ अशा शब्दात तळवलकर कुटुंबातील सीता तळवळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कैझाद यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
1989 मध्ये कैझाद कपाडिया यांनी वयाच्या 17 व्या वर्षी त्यांचा पहिला बॉडीबिल्डिंग शो जिंकला. त्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी ज्युनियर मिस्टर मुंबई स्पर्धा जिंकली आणि त्याच वर्षी जूनियर इंडियामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला. 2005 मध्ये ते ‘मिस्टर मुंबई; झाले. 2005 मध्येच देशातील 10 सर्वोत्तम बॉडीबिल्डर्समध्ये कैझाद यांचे नाव समाविष्ट झाले होते. पुढे 2006 आणि 2008 ते मिस्टर महाराष्ट्र ठरले. (हेही वाचा: डार्क चॉकलेट ते अक्रोड, 'हे' अन्नपदार्थ तुम्हाला हृदयरोगापासून दूर ठेवण्यास मदत करतील)
दरम्यान, फिटनेस ट्रेनर म्हणून कैझाद यांनी 'बजाज कुटुंबां'पासून सुरुवात केली. 1991-1999 दरम्यान कैझाद यांची लोकप्रिया शिगेला पोहोचली होती. त्यानंतर कैझाद यांनी बिर्ला, सिंघानिया, गरवारे आणि खटाऊ कुटुंबातील सदस्यांना ट्रेनिंग दिले. 2003 मध्ये त्यांनी फिटनेस उद्योगातील शिक्षण गांभीर्याने घेण्याचा निर्णय घेतला आणि के 11 फिटनेस अकादमीची सह-स्थापना केली. आज, K11 ही भारतीय फिटनेस उद्योगातील एक प्रमुख शिक्षण संस्था आहे.