Kaas Plateau Open For Tourists: कास पठार नव्या सुविधांसह पर्यटकांसाठी खुले; पहा काय आहे खास!

जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेले युनेस्को जागतिक वारसास्थळ कास पठार 1 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे. यंदा पर्यटकांच्या सोयीसाठी नवीन व्ह्यूपॉइंट्स, पायवाटा, हिरकणी कक्ष यांसारख्या सुविधा उभारण्यात आल्या असून, पर्यावरण संवर्धनावरही विशेष भर देण्यात आला आहे.

Kaas Pathar | X @maha_tourism

जैवविविधतेसाठी जगप्रसिद्ध असलेले आणि युनेस्को जागतिक वारसास्थळाचा दर्जा लाभलेले कास पठार (Kaas Plateau) 1 सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुले झाले आहे. दरवर्षी येथे बहरणाऱ्या रंगीबेरंगी फुलांचा नजारा पाहण्यासाठी राज्यभरातून तसेच देशाच्या विविध भागांतून पर्यटक येथे गर्दी करतात. यंदाच्या हंगामाआधी सातारा वन विभाग आणि कास संयुक्त वन व्यवस्थापन समितीने पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधा उभारल्या असून, त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनावरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

कास पठारावर नव्या सुविधांमध्ये काय समाविष्ट?

यंदा पठारावर तीन नवे व्ह्यूपॉइंट्स उभारण्यात आले असून, त्यात मांडपघळसह इतर दोन ठिकाणांचा समावेश आहे. या व्ह्यूपॉइंट्समुळे पर्यटकांना निसर्गरम्य ठिकाणी सहज पोहोचता येणार असून, त्याचबरोबर पर्यटकांच्या हालचालींचे नियमनही करता येणार आहे. फुले आणि नाजूक वनस्पतींचे संरक्षण व्हावे यासाठी लॅटराइट दगडांच्या पायवाटा तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पर्यटकांना ठरावीक मार्गानेच फिरता येईल.

गर्दीच्या वेळी किंवा अवकाळी पावसात पर्यटकांना आधार मिळावा यासाठी निवारायुक्त प्रतीक्षा कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच महिला पर्यटकांसाठी हिरकणी कक्ष आणि कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोलीचीही सुविधा प्रथमच देण्यात आली आहे, ज्यामुळे लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय पर्यटकांसाठी एक सुव्हेनिअर शॉपदेखील सुरू करण्यात आले आहे.

प्लास्टिकमुक्तीसाठी मातीच्या कपांचा वापर

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कास पठारावर प्लास्टिक कचरा कमी करण्याच्या दृष्टीने वन विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे पर्यटकांना चहा प्लास्टिकऐवजी पारंपरिक मातीच्या कपांमधून दिला जाणार आहे.

सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले की, कास पठाराचे संवर्धन करत असतानाच पर्यटकांसाठी सुविधा विकसित करून पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. "पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी विशेषतः लहान मुलांसह येणाऱ्या कुटुंबांसाठी निवारायुक्त प्रतीक्षा कक्षाची सुविधा दिली जाणार आहे," असे हिंदुस्थान टाईम्सचे वृत्त आहे.

"महिला पर्यटकांसाठी प्रथमच हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत आहे. मातीच्या कपांच्या वापरामुळे प्लास्टिक कपांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होईल. नव्याने तयार केलेल्या लॅटराइट पायवाटांमुळे फुलांचे संरक्षण करण्यास मदत होईल. हे सर्व प्रयत्न शाश्वत इको-टुरिझमला चालना देतील," असेही त्यांनी नमूद केले आहे.

कास पठारावर पर्यटकांसाठी प्रवेश 1 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. कास पठारावर गर्दी नियंत्रणासाठी आता दिवसाला 3 हजार पर्यटकांची मर्यादा आहे. त्यासाठी आता प्रवेश फी 200 रूपये प्रति व्यक्ती आहे. या नवीन शुल्कात पार्किंग आणि तेथून पठारापर्यंतची बस सेवा सर्वांसाठी मोफत दिली जाते. पर्यटकांनी ऑनलाईन बुकींग केल्यास प्रिंट असणे अनिवार्य, मोबाइल स्क्रीनशॉट ग्राह्य समजला जात नाही. तर 12 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. दरम्यान कास पठार पर्यटनासाठी तुम्ही अधिकृत संकेतस्थळ www.kas.ind.in ला भेट देऊ शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement