'के. चंद्रशेखर राव यांच्या प्रयत्नांचे स्वागत आहे, परंतु Congress शिवाय BJP विरोधी आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही'- Nana Patole
मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी हाच भाजपविरोधी एकमेव पर्याय आहे
तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी रविवारी मुंबईत त्यांचे महाराष्ट्राचे समपदस्थ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्यांनी ठाकरे आणि पवार यांच्याशी देशातील विविध प्रश्नांवर चर्चा केली आणि (राजकीय) बदलाचे आवाहन केले. आता यावर महाराष्ट्र काँग्रेसने रविवारी सांगितले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे भाजपविरोधी आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत व या प्रयत्नांचे स्वागत आहे. परंतु कॉंग्रेसने असाही इशारा दिला की, पण काँग्रेस पक्षाशिवाय भाजपाविरोधातील आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘भाजपविरोधी आघाडी स्थापन करण्याच्या राव यांच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो, मात्र काँग्रेसशिवाय असे प्रयत्न पूर्ण होणार नाहीत. यावेळी पटोले यांनी केंद्र सरकार हुकूमशाही असल्याचा आरोप केला. संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचे काम केंद्र करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. केंद्रावर राष्ट्रीय संपत्ती विकल्याचा आरोपही त्यांनी केला.
पटोले म्हणाले, ‘विरोधकांवर निशाणा साधण्याबरोबरच मित्रपक्षांनाही संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याचा अनेक पक्षांना अनुभव आल्याने आता ते पक्ष भाजपपासून दुरावले आहेत. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही नेत्यांच्या भेटीसाठी येथे आल्या होत्या, मात्र त्याबाबत ठोस काहीच घडले नाही.’ (हेही वाचा: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले आजच्या भेटीत...)
ते पुढे म्हणाले, ‘टीआरएसने यापूर्वी संसदेत भूमिका घेतली होती, जी भाजपसाठी ‘फायदेशीर’ होती परंतु आता भाजपबद्दलचे त्यांचे मत बदलले आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी हाच भाजपविरोधी एकमेव पर्याय आहे व कॉंग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची भाजपविरोधी आघाडी होऊच शकत नाही.