Juvenile Delinquency: क्षुल्लक कारणावरुन वर्गमित्रावर चाकूने वार, 13 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल; मुंबई येथील घटना
धक्कादायक म्हणजे या मुलाने क्षुल्लक कारणावरुन वर्गमित्रावर चाकून वार केले आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगा 15 वर्षांचा आहे. हल्ला करणारा मुलगा आणि पीडित यांच्यात क्षुल्लक कारणावरुन सोमवारी वाद झाला होता. या वादाच्या रागातून प्रकरण या थराला गेले.
मुंबईतील (Mumbai Police) साकीनाका पोलिसांनी ( Sakinaka Police) अवघ्या 13 वर्षांच्या शालेय मुलावर गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे या मुलाने क्षुल्लक कारणावरुन वर्गमित्रावर चाकून वार (Stabbed) केले आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलगा 15 वर्षांचा आहे. हल्ला करणारा मुलगा आणि पीडित यांच्यात क्षुल्लक कारणावरुन सोमवारी वाद झाला होता. या वादाच्या रागातून प्रकरण या थराला गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. उल्लेखनिय असे की, दोन्ही मुले ही पवई येथे एकाच शाळेत शिकतात.
इन्स्टाग्रामवर थेट मेसेज
एकाच शाळेत शिकत असलेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये 25 जानेवारी रोजी शाळेतील स्वच्छतागृहात भांडण झाले. चुकून एकमेकांना धक्का लागल्यावर दोन्ही मुलांमध्ये हे भांडण झाले. दोघांमधील बाचाबाची वाढली आणि दोघांनी परस्परांना धक्काबुक्की सुरु केली. त्यानंतर उपस्थित असलेल्या इतर मुलांनी दोघांनाही खेचून परस्परांपासून दूर केले. दरम्यान, आठवडाभरानंतर आरोपीने पीडित विद्यार्थ्याला इन्स्टाग्रामवर थेट मेसेज केला. मला तुला खुल्या मैदानात भेटायचे आहे जिथे आपला राहिलेला विषय पूर्ण करायचा आहे. त्यासाठी पीडित मुलगाही तयार झाला आणि दोघेही साकीनाका येथील मैदानावर सोमवारी भेटले. मात्र, शब्दाने शब्द वाढत गेला आणि पुन्हा भांडण सुरु झाले. (हेही वाचा, Schoolboy Attack Classmate: शाळेतील भांडणातून वर्गमित्रावर हल्ला; इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलास कंपासने 108 वेळा भोसकले)
बाल कल्याण आयोगाकडे पाठवला अहवाल
आरोपी स्वत:सोबत चाकू घेऊनच आला होता. त्याने थेट वार करण्यास सुरुवात केली. आरोपीने पीडिताच्या चेहऱ्यावर आणि दंडावर वार केले. त्याने पीडिताच्या पाठीवरही जोरदार वार केले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळ सोडले. जखमी मुलाच्या मित्राने कुटुंबीयांना कल्पना दिली आणि त्याला दवाखान्यात नेले. दरम्यान, अद्यापपर्यंत आरोपीला ताब्यात घेण्यात आले नाही. आरोपीबाबत माहिती देणारा अहवाल बाल कल्याण आयोगाकडे (CBC) पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. (हेही वाचा, Pune: मैत्रिणीशी बोलतो! शालेय विद्यार्थ्यावर अल्पवयीन मुलाचा कोयत्याने हल्ला)
सहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार
दरम्यान, साकीनाका पोलिसांनी आणखी एका प्रकरणात वेगळ्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. तो मुलगाही 14 वर्षांचाच आहे. त्याच्यावर सहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही मुले एकाच वस्तीत राहतात.
लहान मुलाने त्याच्या पालकांना आपल्या त्रासाची माहिती दिली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीनंतर बालकल्याण आयोगाकडे अहवाल पाठवला जाणार आहे. लहान मुलांमधील गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. लहान मुलांमध्ये वाढत असलेला स्क्रीन टाईम, त्यातून निर्माण होणारा ताण, सहज उपलब्ध असणारी शस्त्रे, आहार, झोप आणि मार्गदर्शन अशा विविध कारणांमुळे मुलांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.