जितेंद्र आव्हाड सोलापूर जिल्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणार, दिलीप वळसे-पाटील देणार आपल्या खात्याकडे अधिक लक्ष
जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनाही या जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक वेळ देता येतो का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे आता सोलापूर जिल्हा पालकमंत्री (Solapur District Guardian Minister) पदाची जबाबदारी आली आहे. या आधी दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र, अचानक खांदेपालट केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. काही विश्लेषकांच्या मते दिलीप वळसे पाटील हो अभ्यासू आणि जबाबदार राजकीय नेते आहेत. त्यांच्यावर कामगार मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना सोलापूर जिल्ह्याच्या विकासाकडे विशेष लक्ष देता येत नव्हते. या पार्श्वभूमीवर खांदेपालट करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा.
महत्त्वाचे म्हणजे सोलापूर जिल्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्याचे नक्की झाल्यावर त्याबाबतचा आदेशही तक्काळ काढण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनाही या जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक वेळ देता येतो का हे पाहणे उत्सुकतेचे आहे. (हेही वाचा, Coronavirus: सरकारच्या सूचनांचे पालन न केल्यास, मोठी किंमत मोजावी लागेल; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी साधला संवाद)
जितेंद्र आव्हाड ट्विट
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरस संकट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. अशा राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांवरील जबाबदारीही प्रचंड वाढली आहे. राज्याच्या असंघटीत कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे असंघटीत आणि संघटीतही कामगारांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्हा पालकमंत्री पदाची जबाबदारी असल्यामुळे वळसे पाटील यांना कामगारांच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष देता येत नव्हते. कदाचित त्याचमुळे त्यांच्याकडील पालकमंत्री पदाची जबाबदारी काढून ती आव्हाड यांच्याकडे देण्यात आली असावी, असाही एक सुर राजकीय वर्तुळात उमटत आहे.