जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान; पुण्यातील SP कॉलेज चौकातील होर्डिंगमुळे खळबळ
पुणे एसपी चौकातील होर्डिंग (PC - Twitter)

पुण्यातील एसपी कॉलेज चौकात (SP College Chowk) 'जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान,' अशा आशयाचं होर्डिंग (Hoarding) लावण्यात आलं आहे. या होर्डिंगमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या होर्डिंगवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आणि सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात बंगळुरूमधील रॅलीत ‘पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी अमूल्या यांचे फोटोही लावण्यात आले आहेत.

या होर्डिंगवर अमूल्याचा घोषणा देतानाच्या फोटोसह 'जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान,' असं लिहिलेलं आहे. पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या चौकात हे होर्डिंग लावण्यात आलं आहे. ट्विट युझर्स निखिल पवार यांनी या होर्डिंगचा फोटो शेअर करत पुणे पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली आहे. (हेही वाचा - दिल्ली हिंसाचारानंतर मुंबईत कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कलम 144 लागू; रॅली, आंदोलनावर 9 मार्चपर्यंत बंदी)

पुणे पोलिसांनी निखिल पवार यांच्या ट्विटची दखल घेत 'तुमची तक्रार मिळाली असून आम्ही हे प्रकरण संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करत आहोत. संबंधित पोलीस याची चौकशी करून योग्य कारवाई करतील,' असं म्हटलं आहे.

मागील महिन्यात बंगळुरूमध्ये खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी आणि एनपीआर विरोधात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत अमूल्या लियोना नोरोन्हा हिने 'पाकिस्तान जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे अमूल्या हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच घटनेच्या फोटोवर पुण्यात 'जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान,' असा मजकूर लिहण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत असून पुणे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.