सावधान! जालना येथे कोरोना प्रतिबंधक लसच्या नावाखाली ग्रामस्थांकडून पैशांची लूट; 3 महिलांना अटक

तर, 80 हजारांपेक्षा अधिक लोकांना याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरस आता भारतातही दाखल झाला असल्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. यातच कोरोना व्हायरसच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Flickr, RIBI Image Library)

कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातला असून आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांनी आपल जीव गमवला आहे. तर, 80 हजारांपेक्षा अधिक लोकांना याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरस आता भारतातही दाखल झाला असल्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. यातच कोरोना व्हायरसच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. नुकतीच जालना (Jalna) येथे कोरोना प्रतिबंधक लसच्या नावाखाली ग्रामस्थांकडून पैसे उकळल्याची माहिती समोर आली. ही घटना अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे घडली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी 3 महिलांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राधा रामदास सामसे, सीमा कृष्णा आंधळे आणि संगीता राजेंद्र आव्हाड असे या महिलांचे नाव असून त्या मूळच्या बीड जिल्ह्याच्या आहेत. या तीन महिला साष्ट पिंपळगाव परिसरात पैसे घेऊन करोना प्रतिबंधक लस बालकांना पाजत होत्या. या महिलांबद्दल काही स्थानिक महिलांना संशय आला. लस घेतल्याने करोना त्याचप्रमाणे सर्दी-खोकला होत नाही, असे या महिला ग्रामस्थांना सांगत होत्या. त्यांनी काही बालकांना करोना प्रतिबंधक लसीच्या नावाखाली द्रवही दिले. साष्ट पिंपळगाव येथील काही नागरिकांनी या संदर्भात शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साष्ट पिंपळगाव येथे भेट दिली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव मुंडे यांच्या फिर्यादीनंतर गोंदी पोलिसांनी तिन्ही महिलांना अटक केली. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरातील नागरिकांनाही धक्का लागला आहे. हे देखील वाचा- Covid-19: मुंबई महापालिकेने जाहीर केली कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची 12 मार्चपर्यंतची अधिकृत आकडेवारी

महाराष्ट्रासह जगभरात कोरोना व्हायरसची भीती पसरत आहे. दरम्यान आता या व्हायरसपासून बचावण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे याकडे नागरिकांचा कल आहे. पण या भीतीचा गैरफायदा घेत मुंबईमध्ये काही कंपनींकडून बनावट हॅन्ड सॅनिटायझर बनवण्यात आले आहेत. नुकतीच त्यावर एफडीए कडून धाड टाकून हा काळाबाजार बंद करण्यात आला आहे. यामधून 3 लाख रुपयांचे हॅन्ड सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहे. यामुळे कोरोना व्हायरच्या बचावासाठी लागणाऱ्या औषधांची खरेदी करायची की नाही, असाही प्रश्न नागरिकांच्या समोर पडला आहे.