धक्कादायक! 'Pubg' गेममधील पराभवामुळे आलेल्या नैराश्येतून आयटी इंजिनियर ची आत्महत्या; 4 महिन्यापूर्वी झाला होता विवाह
या खेळामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत, अनेक मुलांनी आत्महत्या केली आहे, अनेक जण घर सोडून गेले आहे तरी या खेळाची जादू काही कमी होत नाही.
सध्या तरुणाईला ज्या खेळाने सर्वात जास्त वेड लावले आहे तो म्हणजे पबजी (Pubg). या खेळामुळे अनेक संसार उध्वस्त झाले आहेत, अनेक मुलांनी आत्महत्या केली आहे, अनेक जण घर सोडून गेले आहे तरी या खेळाची जादू काही कमी होत नाही. या खेळामुळे नुकतीच एक धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. टाकळीभान येथील राहूल पवार या उच्चशिक्षित तरुणाने या खेळापाई आत्महत्या केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राहुलचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. सामना वृत्तसंस्थेने याबाबत वृऊ दिले आहे.
श्रीरामपूर बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार यांचा मुलगा राहूल हा आयटी इंजिनियर आहे. त्याने गावात कुकुट्टपालनाचा व्यवसाय सुरु केला होता. आषाढ महिना असल्याने राहुलची बायको माहेरी गेली होती. या दरम्यान राहुलला पबजी खेळाचे वेड लागले. कधी कधी तो रात्रभर हा खेळ खेळत असे. आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री ‘आता सकाळीच माझ्या खोलीचा दरवाजा उघडा. मला माफ करा’ असा संदेश मोबाईलवरून त्याच्या एका नातेवाईकाला पाठविला होता. त्यानंतर रात्री 2 च्या सुमारास दोन बोरच्या शॉर्ट गनने गोळ्या झाडून त्याने आत्महत्या केली.
(हेही वाचा: पतीच्या 'Pubg' खुळापायी पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न)
सकाळी त्याच्या कुटुंबाला ही गोष्ट कळाली. त्यानंतर पोलिसांना ही गोष्ट कळवल्यावर त्यांनी जागेचा पंचनामा केला. याबाबत चौकशी केली असता, राहूल याने पबजी गेममधील पराभवानंतर आलेल्या नैराश्येतून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. मात्र कौटुंबिक नैराश्येतून त्याने आत्महत्या केला असल्याचा दावा पोलिस उपअधिक्षक राहूल मदने यांनी केला आहे.