India's Costliest Apartment: मुंबईमध्ये घडला भारतामधील सर्वात महागड्या अपार्टमेंटचा सौदा; BK Goenka यांनी 240 कोटींना खरेदी केले घर

या प्रकल्पात दोन टॉवर्स आहेत- एक निवासी प्रकल्प आणि दुसरा रिट्झ-कार्लटन हॉटेल असेल. ही मालमत्ता समुद्रासमोर आहे.

थ्री सिक्स्टी वेस्ट लक्झरी प्रकल्प (संग्रहित संपादित प्रतिमा)

याआधी मुकेश अंबानी यांनी दुबईमधील सर्वात महागडे घर विकत घेतल्याची बातमी आली होती. आता मुंबईमध्ये (Mumbai) देशातील सर्वात महागड्या अपार्टमेंटची (India's Costliest Apartment) डील झाली आहे. भारतात विकले गेलेले सर्वात महागडे पेंटहाऊस एका उद्योगपतीला तब्बल 240 कोटी रुपयांना विकले गेल्याची माहिती आहे. वरळी लक्झरी टॉवरमधील हे पेंटहाऊस रिअल इस्टेटमधील सर्वात मोठ्या डीलपैकी एक मानले जाते. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, वेलस्पन ग्रुपचे चेअरमन बीके गोयंका (BK Goenka) यांनी हे पेंटहाउस विकत घेतले आहे, जे भारतात विकले गेलेले सर्वात महागडे अपार्टमेंट आहे.

ट्रिपलेक्स असे हे अपार्टमेंट 30,000 चौरस फुटांचे असून, ते वरळीतील अॅनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्ट लक्झरी प्रकल्पाचा भाग आहे. गगनचुंबी इमारतीच्या टॉवर बी मध्ये 63व्या, 64व्या आणि 65व्या मजल्यावर मिळून हे प्रशस्त पेंटहाऊस आहे. सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत मुंबईतील झोपडपट्टी कुटुंबांना देण्यात आलेल्या मोफत 300 चौरस फुटांच्या फ्लॅटपेक्षा हे पेंटहाऊस 100 पट मोठे असल्याचे सूत्रांनी अहवालात म्हटले आहे. हे भव्य पेंटहाऊसमधून समुद्र किनाऱ्याचे चित्तथरारक दृश्य दिसते.

अहवालात म्हटले आहे की, पुढील दोन महिन्यांत अल्ट्रा-लक्झरी सेगमेंटमध्ये आणखी मोठे सौदे होण्याची अपेक्षा आहे, कारण कलम 54 अंतर्गत परवानगी असलेल्या गुंतवणुकीची एप्रिल 2023 पासून 10 कोटी रुपयांची मर्यादा आहे. याआधी 2015 मध्ये, जिंदाल ड्रग्स ही फार्मास्युटिकल फर्म चालवणाऱ्या जिंदाल कुटुंबाने लोढा अल्टामाउंटमध्ये 160 कोटी रुपयांमध्ये एक अपार्टमेंट विकत घेतले होते. तसेच 2022 मध्ये, अभिनेता रणवीर सिंगने वांद्रे बँडस्टँड येथील सागर बिल्डिंगमध्ये 119 कोटी रुपयांना एक क्वाड्रप्लेक्स विकत घेतला आहे. (हेही वाचा: देशातील सर्वात मोठा मालमत्ता करार; D’Mart च्या Radhakrishna Damani यांनी 1,238 कोटींना खरेदी केली 28 लक्झरी अपार्टमेंट्स- Reports)

दरम्यान, थ्री सिक्स्टी वेस्ट हा भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांना घरे देणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पात दोन टॉवर्स आहेत- एक निवासी प्रकल्प आणि दुसरा रिट्झ-कार्लटन हॉटेल असेल. ही मालमत्ता समुद्रासमोर आहे.