I-N-D-I-A Coordination Committee Meeting: शरद पवार यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक, लोकसभा जागावाटपाचे सूत्र ठरणार?
आघाडीतील सर्व घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार असून, आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
India Alliance Coordination Committee Meeting: मुंबईत पार पडलेल्या 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (I.N.D.I.A.) आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना झाली आणि विरोधकांचा एक मोठा विषय मार्गी लागला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी या इंडिया समन्वय समितीची एक बैठक आज (बुधवार, 13 सप्टेंबर) )पार पडत असल्याची माहिती आहे. आघाडीतील सर्व घटक पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार असून, आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार, इंडिया आघडी समन्वय समितीमध्ये एकूण 14 नेत्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल, डीएमके नेते टीआर बालू, जेएमएम नेते हेमंत सोरेन, शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते संजय राऊत, आरजेडी नेते तेजस्वी यांचा समावेश आहे. यादव, आप नेते राघव चढ्ढा, समाजवादी पक्षाचे नेते जावेद अली खान, जेडीयू नेते लालन सिंह, सीपीआय नेते डी राजा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी आणि सीपीआय-एमचा एक सदस्य आदींचा समावेश आहे.
दरम्यान, टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांना अंमलबजावणी संचालनालयानं चौकशीसाठी बुधवारी बुधवारी (13 सप्टेंबर) बोलावले असल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर जनता दल युनायडेडचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह हेसुद्धा प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे समजते. त्यांच्या वतीने बिहारचे मंत्री संजय कुमार झा उपस्थित राहतील. तर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने अद्याप कोणत्याही नेत्याचे नाव समन्वय समितीसाठी दिले नाही. त्यामुळे त्यांच्यातील कोणी बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. दुसऱ्या बाजूला सीपीआय-एम पॉलिटब्युरोची एक बैठक 16-17 सप्टेंबर रोजी पार पडते आहे. या बैठकीत या समितीसाठी नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.